फॅक्ट्रीतील रिऍक्टरच्या स्फोटात 7 ठार, 27 जखमी

हैदराबाद, : तेलंगणातील संगारेड्डी येथील एका कारखान्यात आग लागल्याने बुधवारी मोठा स्फोट झाला. या अपघातात 7 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 27 जण गंभीर जखमी असल्याची माहिती असल्याबाबत वृत्त हिंदुस्थान समाचार वृत्तसंस्थेने दिले आहे.

    यासंदर्भातील माहितीनुसार संगारेड्डी जिल्ह्यात बुधवारी एसबी ऑर्गेनिक इंडस्ट्री नामक फार्मास्युटिकल फॅक्टरीच्या रिऍक्टरमध्ये झालेल्या स्फोटात पाच जण ठार आणि 27 जण जखमी झाले आहेत. हा स्फोट इतका भयानक होता की, यात कारखान्याची संपूर्ण इमारत नष्ट झाली आहे. अपघाताच्या वेळी कारखान्यात सुमारे 50 कामगार कामावर असल्याची माहिती पुढे आली आहे. कारखान्यात आज, बुधवारी संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास झालेल्या स्फोटामुळे ही आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलिस आणि इतर प्रशासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदत आणि बचावकार्य सुरू केले. 

    याबाबत एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, फार्मा कंपनीच्या रिऍक्टरचा स्फोट झाला आणि आसपासचे लोक प्रभावित झाले. स्फोटामुळे लोक काही अंतरावर पडले. आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 27 जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी प्रशासनाकडून संपूर्ण घटनेचा आढावा घेतला. तसेच दोन राज्यमंत्र्यांना घटनास्थळी रवाना केलेय. दरम्यान स्फोटाची भयानकता लक्षात घेता मृतकांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय.