शासकीय महिला कर्मचाऱ्यांचा जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

मुंबई : बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने दिनांक १२ मार्च रोजी आरोग्य भवन सभागृहात जागतिक महिला दिनानिमित्त शासकीय महिला कर्मचाऱ्यांचा भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटने सरचिटणीस विश्वास काटकर यांनी उपस्थित महिलांना शुभेच्छा देऊन संघटना कार्यातील त्यांच्या वाढत्या सहभागाची प्रशंसा केली. 

      प्रमुख पाहुण्या सुप्रसिद्ध निवेदिका उत्तरा मोने यांनी महिला सर्व क्षेत्रात अग्रेसर असल्याचे प्रतिपादन करुन‌ आता त्यांनी अधिक सजगतेने सामाजिक कार्य करावे असे आवाहन केले. बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस अविनाश दौंड यांनी संघटनेने अलिकडच्या काळात जुन्या पेन्शन बाबतचा यशस्वी लढा दिला त्यात महिला कर्मचारी अग्रभागी होत्या. शासकीय महिला कर्मचारी या प्रामाणिकपणे शासकीय सेवा बजावत असुन त्यांना केंद्र सरकारी महिला कर्मचाऱ्यां प्रमाणे दोन वर्षं बालसंगोपन रजा मिळावी अशी मागणी केली. संघटना अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख यांनी महिलांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून संघटनेने अनेक स्पर्धांचे आयोजन केले असून त्यातील यशस्वी स्पर्धकांचे अभिनंदन केले. 

    याप्रसंगी ज्येष्ठ महिला नेत्या रेखा म्हात्रे यांना " जीवन गौरव" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात बहारदार समुह नृत्य स्पर्धा पार पडली. शासनाने या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी विशेष वेळेची सवलत जाहीर केली. कार्यक्रमास मंत्रालय, शासकीय मुद्रणालय, शासकीय रुग्णालये, मोटार वाहन, तंत्रशिक्षण विभाग, कला संचालनालय, विमा संचालनालय, वस्तू व सेवा कर विभाग, लोकसेवा आयोग, न्यायवैद्यक प्रयोगशाळा, आरोग्य संचालनालय आदी कार्यालयातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किर्ती लुमण, पाहुण्यांचा परिचय श्रद्धा तेंडुलकर तर आभार प्रदर्शन कविता ठोंबरे यांनी केले.