'आयटक'च्या नेतृत्वात विविध संघटनांचा सहभाग
नागपूर: ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) आणि राष्ट्रीय आदिम कृती समितीचा मोर्चा सोमवारी लक्षवेधक ठरला. हजारोंच्या संख्येने सहभागी झालेल्या मोर्चेकऱ्यांनी घोषणाबाजी करून संपूर्ण परिसर दणाणून सोडला. या मोर्च्यामुळे सीताबर्डी भागातील वाहतूक दिवसभरासाठी ठप्प झाली होती. त्यामुळे वाहन चालकांना मोठा मनस्ताप झाला. या दोन महामोर्चासह सोमवारी एकूण २० मोर्चांनी विधानभवनावर धडक दिली असे वृत्त सकाळ वृत्तसंस्थेने दिले आहे.
ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) सलग्नित महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन, अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियन, आरोग्य खाते आशा व गट प्रवर्तक संघटना, ग्रामीण जीवनोन्नती कर्मचारी संघटना, आरोग्य खाते अंशकालीन स्त्री परिचर कृती समिती, ग्राम पंचायत कर्मचारी महासंघ या सात संघटनांचा एकत्रित मोर्चा विधिमंडळावर धडकला.
मोर्चाचे नेतृत्व आयटकचे राज्य सरचिटणिस श्याम काळे, राष्ट्रीय सचिव सुकुमार दामले, मोहन शर्मा, सी. एन. देशमुख, दिलीप उटाणे, माधुरी क्षीरसागर, वनिता कापसे, राजू देसले, सुमन पुजारी, मंदा डोंगरे, मंगला पांडे यांनी केले. मॉरिस कॉलेज टी पाँइंटवर मोर्चा थांबल्यानंतर मोर्चेकरी आक्रमक झाल्याने काही वेळ पोलिसांची तारांबळ उडाली. हजारो महिलांची संख्या पाहता खाद्य पदार्थ विक्रेते तसेच उनी कपडे विक्रेत्यांनी दुकान थाटल्याने प्रचंड गर्दी झाली.
कामगारांची दखल घेत आमदार रोहित पवार यांनी मोर्चाला भेट देऊन मार्गदर्शन केले. मॉरिस कॉलेज टी पाँइंट ते व्हेरायटी चौक पर्यंत हजारोंच्या संख्येने मोर्चेकरी असल्याने गोवारी उड्डाणपूल आणि सीताबर्डी मार्ग बंद ठेवण्यात आला होता.
प्रमुख मागण्या :
- कामगार विरोधी श्रमसंहिता रद्द करा., अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे वेतन २६ हजार रुपये आणि पेंशन द्यावे.
- आशा व गटप्रवर्तकाच्या संपादरम्यान मान्य केलेल्या मागण्यांचा शासन निर्णय त्वरित काढा.
- ग्राम रोजगार सेवकांना निश्चित स्वरूपाचा मोबदला द्या., अंशकालीन स्त्री परिचराच्या मानधनात वाढ करा.
- सार्वजनिक उद्योग व सेवांचे खासगीकरण बंद करा. , आऊटसोर्सींगद्वारे नोकर भरती बंद करा.
- घरकामगार, मोलकरीण, सुरक्षारक्षक या कामगारांना सेवा शर्ती व विमा कवच लागू करा.