पुणे जिल्ह्यातील कंपनी गुजरातच्या वाटेवर; प्रशासनाच्या त्रासाला कंटाळल्याचा आरोप

शिक्रापूर : करंदी (ता. शिरुर) येथील संकल्प इंजिनिअरिंग या कंपनीच्या रस्त्याबाबत प्रशासनाकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून गुजरातमध्ये हलविण्याच्या मार्गावर आहे, असा आरोप कंपनीच्यावतीने केला. यामुळे हजारो युवकांचे भवितव्य धोक्यात येणार आहे असे वृत्त नवराष्ट्र वृत्तसंस्थेने दिले आहे.

    करंदी (ता. शिरुर) येथे २००८ मध्ये खासगी जागेमध्ये संकल्प इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रायवेट लिमिटेड ही कंपनी सुरु झाली. कंपनी निर्मित उत्पादने बाहेरील देशात जात असल्याने विदेशी पैसा भारतात येऊ लागला. दरम्यान या कंपनीला रस्त्याची अडचण असताना महसूल विभागाने राखीव जागेतून रितसर परवानगीने रस्ता दिला होता. या जागेला अद्यापदेखील सरकारी गायरान म्हणून नोंद आहे. मात्र २०२० मध्ये सरकारी गायरान नोंद असलेली रस्त्याची जागा महसूल विभागाकडून वन विभागाकडे वर्ग झाली. त्यांनतर २०२१ मध्ये वन विभागाने कंपनीला पत्र देत रस्ता वापर बंद करण्याबाबत कळवले. 

    त्यांनतर कंपनी प्रशासनाने वरिष्ठ कार्यालयासह मंत्रालयात रस्त्यासाठी जागा मागण्याबाबत पाठपुरावा सुरु केला. तर काही नागरिकांनी त्यांच्या फायद्यासाठी, तसेच काही काम मिळवण्यासाठी कंपनीच्या रस्त्याबाबत वेगवेगळ्या स्वरूपाच्या खोट्या तक्रारी केल्या. काही नागरिकांनी व्यक्तिगत फायद्यासाठी शासकीय कार्यलयात आंदोलन उभारत कंपनीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. 

    मात्र कंपनी प्रशासनाने आजपर्यंत कामगारांच्या हिताचा विचार करुन अडचणींचा सामना करत कंपनी सुरु ठेवली आहे. तसेच वरिष्ठ कार्यालय, तसेच मंत्रालयात पाठपुरावा करत रितसर पद्धतीने रस्त्याची मागणी सुरु ठेवली आहे. परंतु प्रशासनाकडून अद्यापपर्यंत कंपनीला प्रतिसाद मिळत नसल्याने, अखेर कंपनी प्रशासनाने ही कंपनी गुजरातमधील राजकोटमध्ये हलवण्याचा विचार करत आहे. मात्र प्रशासनाच्या त्रासाला कंटाळून कंपनी दुसऱ्या राज्यात गेल्यास येथील कामगारांचे कुटुंब उघडे पडणार असल्याचा धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर याबाबत योग्य दखल घेत कंपनी व कामगार हिताचा निर्णय घेणे गरजेचे आहे.

कंपनीमुळे कर, उपक्रम अन‌ रोजगार

    करंदी गावामध्ये सुरु झालेल्या या कंपनीमुळे गावाला लाखो रुपयांचा कर मिळून गावातील विकास होऊ लागला. तसेच कंपनीने गावात समाजपयोगी उपक्रम राबवत ५०० झाडांचे वृक्षारोपण करत संगोपन केले. तसेच शेकडो युवकांना रोजगार मिळून अनेक कुटुंब त्यावर अवलंबून राहू लागले. मात्र कंपनी बंद मोठा धोका निर्माण होणार आहे.

कित्येक ठिकाणी तरुणांना रोजगार नाही. शासन महाराष्ट्रात नवीन कंपन्या आणण्यासाठी सवलत देणार आहे. परंतु प्रशासनामुळेच एखादी कंपनी बंद होऊन बाहेर राज्यात जाणार असेल तर अनेक कुटुंब उघड्यावर पडू शकतात व परिणामी बाहेर राज्यातून इकडे येऊ इच्छिणाऱ्या कंपन्यांवर याचा परिणाम होईल.
-महेश साबळे, सामाजिक कार्यकर्ते

वनविभागाने रस्ता त्वरित बंद करा अशी विनंती केली, रस्ता बंद केला तर कंपनी पूर्णपणे बंद पडेल मात्र प्रशासनाने जातीने लक्ष घालून आमचा रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला तर कंपनी वाचेल कामगार जगातील तसेच महाराष्ट्रातून बाहेर जाणारी कंपनी वाचेल.
- कपिल यादव, व्यवस्थापक, संकल्प इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रायवेट लि.