सरकारच्या विराेधात जनरल मोटर्सच्या कामगारांचे मुंडन आंदाेलन

पुणे : मावळ येथील तळेगाव दाभाडे एमआयडीसी मधील बंद पडलेल्या जनरल मोटर्सचे कामगार पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. जनरल मोटर्स कंपनी व राज्य सरकार यांच्याकडून होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात जनरल मोटर्स कामगारांनी मुंडण करुन सरकारच्या निर्णयाचा निषेध नाेंदविला.

    मावळात गेल्या 33 दिवसांपासून जनरल मोटर्सच्या एक हजार कामगारांचे साखळी उपोषण सुरू आहे. या आंदाेलकांची काही दिवसांपूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भेट घेतली. त्यानंतरही कामगारांनी आंदाेलन मागे घेतले नाही. त्यावेळी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी देखील कामगारांच्या पाठीमागे ठाम उभे राहणार असल्याचे स्पष्ट केले.

    दरम्यान कामगारांनी शासनाचा निषेध म्हणून मुंडन आंदोलन सुरू केले आहे. इथून पुढे आंदोलन चालूच राहणार असे कामगारांनी स्पष्ट केले. सरकारने जनरल मोटर्सचे उर्वरित कामगार नामांकित कंपनीला हस्तांतरित करण्यासाठी शासन स्तरावर कोणतीही कारवाई केली नसल्यासने कामगारांनी सरकारचा निषेध नाेंदविला आहे.