सातारा : शिरवळ, ता खंडाळा येथील रियटर कंपनीतील २५ कामगारांना पूर्ववत मागील नोकरीच्या सलगतेसह त्वरित कामावर घेण्यात यावे, नोकरीतून कमी केलेल्या दिवसापासून परत नोकरीत घेण्यात येईल त्या काळापर्यंतचे संपूर्ण वेतन देण्यात यावे या तसेच विविध मागण्यांसाठी कामगारांनी सोमवार दि.६ नोव्हेंबर पासून कंपनी गेट समोर आमरण उपोषण चालू केले आहे.
याबाबत माहिती देताना कामगार संघटनेच्या वतीने सांगण्यात आले कि,
दिनांक १४/०९/२०२३ रोजी मा. अप्पर कामगार आयुक्त यांनी रियटर इंडिया प्रा.लि. चे व्यवस्थापन प्रतिनिधी व रियटर इंडिया एम्प्लॉईज फेडरेशनचे प्रतिनिधी यांची बैठक आयोजित केली होती. सदर बैठकीमध्ये संपाचे नोटीस दिल्यानंतर एकूण १२ कामगारांना व्यवस्थापनाने नोकरीतून तडकाफडकी बडतर्फ केलेल्या कामगारांविरुद्धचे आरोप गंभीर स्वरूपाचे नसल्याने सदर बडतर्फीचे आदेश मागे घेऊन सदर कामगारांना ४ दिवसापर्यंतची निलंबनाची शिक्षा देऊन सदर १२ कामगारांना १५ दिवसामध्ये नोकरीत रुजू करून घेण्यात यावे, यावर एकमत झाले होते.
याशिवाय इतर १२ कामगारांची सुरू असलेली चौकशी बंद करून, त्यांचे निलंबन रद्द करून, त्यांच्या विरुद्धचे आरोप गंभीर स्वरूपाचे नसल्याने त्यांना दोन दिवसाची निलंबनाची शिक्षा देऊन त्यांना १५ दिवसामध्ये कामावर रुजू करून घेण्यात येईल. यावर सदर बैठकीत चर्चा करून एक मत झाले होते.
याशिवाय इतर एकूण ३९ कामगारांना देण्यात आलेली आरोपपत्र व सदर आरोपपत्रातील आरोप हे गंभीर स्वरूपाचे नसल्याने सदर सर्व ३९ कामगारांना ताकीद पत्र देण्यात येऊन सदर प्रकरण संपुष्टात आणण्यात येईल. यावर बैठकीत एकमत झालेले होते.
दिनांक १४/०९/२०२३ रोजीच्या सदर बैठकीत वरील प्रमाणे तोडगा काढण्याबाबत उभयपक्ष्यात एक मत झाले असून, त्यावर वरिष्ठ व्यवस्थापन सकारात्मक निर्णय घेवून तसे संघटना व मा. अपर कामगार आयुक्त यांना कळविण्याचे आश्वासन सदर बैठकीत व्यवस्थापन प्रतिनिधींनी दिले होते. याबाबत कंपनी व्यवस्थापन व मा. अप्पर कामगार आयुक्त पुणे, यांना रियटर इंडिया एम्प्लॉइज फेडरेशनने दिनांक २०/०९/२०२३ रोजीच्या पत्राने तसे कळविले आहे.
वरील प्रमाणे समझोता झालेला असताना, व्यवस्थापनाने त्यांचे पालन केलेले नाही संप काळात एकूण १२ कामगारांविरुद्ध केलेली बडतर्फची कारवाई व समझोता झाल्यानंतर एकूण १३ कामगारांना तडकाफडकी नोकरीतून बडतर्फ केलेली कारवाई ही अत्यंत बेकायदेशीर व अन्यायकारक व अनुचित कामगार प्रथेत मोडणारे आहे, त्यामुळे आमरण उपोषण चालू करण्यात येत असून एकूण २५ कामगारांना पूर्ववत मागील नोकरीच्या सलगतेसह त्वरित कामावर घेण्यात यावे. नोकरीतून कमी केलेल्या दिवसापासून परत नोकरीत घेण्यात येईल त्या काळापर्यंतचे संपूर्ण वेतन देण्यात यावे या मागण्या प्रामुख्याने करण्यात आल्या आहेत अशी माहिती कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आल्या.