कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

छत्रपती संभाजीनगर : किमान वेतनासह दिवाळी बोनस मिळावा, पीएफ लागू करण्यात यावा, यासह इतर मागण्यांसाठी महापालिकेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (ता. १०) भडकल गेट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात धरणे आंदोलन केले. राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

महापालिकेतील कायम कर्मचारी निवृत्त होत असल्याने प्रशासनाने कंत्राटी पद्धतीने कर्मचारी घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सध्या सुमारे १२५६ कर्मचारी कंत्राटी कर्मचारी सध्या महापालिकेत कार्यरत आहेत.

महाराणा, गॅलेक्सी एजन्सीच्या माध्यमातून हे कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र या कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन दिले जात नाही, असा कामगारांचा आरोप आहे. कर्मचाऱ्यांचा ईपीएफ (एम्पलॉई प्रॉव्हिडंट फंड) भरावा, ईएसआयसीची सुविधा द्यावी, शासकीय नियमानुसार मिळणारे लाभ द्यावेत.

एजन्सीकडून प्रत्येक महिन्याला सात तारखेला वेतन अदा करण्यात यावे, या मागण्यांसाठी कंत्राटी कामगारांनी शुक्रवारी सकाळी अकरा वाजता भडकल गेट येथे धरणे आंदोलन केले, असे श्रमिक आघाडीचे संदीपान काचे यांनी सांगितले.