चिंचवड, पुणे : येथील एक्साईड इंडस्ट्रीज कामगारांनी विविध मागण्यासाठी दि.३० ऑक्टोबर २०२३ पासून संप पुकारला आहे. याप्रसंगी संघटनेचे प्रदेश सचिव ईश्वरजी वाघ आणि युनियन कमिटी मेंबर दिलीप भोंडवे, सुनिल राजगुरू, आत्माराम धुमाळ, सुनिल परसे, भाऊसाहेब कदम, रवींद्र खराडे, निखिल शेटे, गोकुळ झुरूंगे, संतोष तापकीर आणि सर्व कामगार उपस्थित होते.
याबाबत संघटनेने दिलेली माहिती पुढील प्रमाणे -
संघटनेने दिलेल्या दि. २३/०४/२०२३ रोजी दिलेल्या संपाच्या नोटीसमध्ये नमूद केल्याप्रमाणे आस्थापनेतील संघटनेचे सर्व कायम कामगार सभासद यांनी दिनांक ०८/०५/२०२३ पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला होता त्यानंतर कामगार आयुक्त यांनी केलेल्या सकारात्मक मध्यस्थी प्रमाणे आणि त्यांनी दिनांक ०४/०५/२०२३ रोजीच्या पाठविलेल्या पत्राद्वारे दिलेल्या आश्वासनानुसार त्यांच्या विनंतीचा मान राखून संघटनेने संपाला तात्पुरत्या स्वरूपाची स्थगिती देण्यात आली होती.
त्यानंतर कामगार आयुक्तांच्या प्रयत्नातून दिनांक २४/०५/२०२३ रोजी सह्याद्री अतिथी ग्रह मलाबार हिल मुंबई येथे कामगार मंत्री महोदय यांच्या सोबत तेथील त्यांच्या दालनामध्ये एक बैठक आयोजित करण्यात आली. त्या बैठकीस कंपनी व्यवस्थापना तर्फे व्यवस्थापनाचे अधिकारी उपस्थित होते त्यानंतर संघटना आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये समेट घडविण्यासाठी चर्चा सुरू झाली. गेल्या पाच महिन्याच्या कालावधीमध्ये संघटनेने व्यवस्थापनाला संपूर्ण सकारात्मक प्रतिसाद दिला परंतु व्यवस्थापन आपले धोरण कायम ठेवत कामगारांच्या आणि कंपनीच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत घातक आणि जाचक अटी संघटनेसमोर मांडत आले. यावरून असे लक्षात येते की व्यवस्थापन समेट घडवण्यासाठी उत्सुक नाही.
1. कंपनी व्यवस्थापनाने महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ या युनियनला स्वीकारावे
2. संघटना स्थापन झाल्यापासून कंपनी व्यवस्थापनाने सूडबुद्धीने ३० कामगारांवर केलेल्या विविध कारवाया मागे घेत त्यांना पुन्हा कामावर रुजू करून घ्यावे.
जो पर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत कामगारांचा संप हा बेमुदत कालावधीसाठी सुरू राहील अशी माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.