कामगाराच्या अपघाती मृत्यूप्रकरणी त्याच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्याचा आदेश कामगार आयुक्ताने देऊनही ती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या श्रीकृष्ण ओअर कॅरियर्सच्या संचालकांचे मुरगावातील दोन फ्लॅट जप्त करण्याचा दणका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिला होता.
या आदेशानंतर त्वरित दुसऱ्या दिवशीच या कंपनीचे संचालक ऋषी नायर यांनी व्याजासह नुकसानभरपाईची रक्कम न्यायालयात जमा केल्याने गोवा खंडपीठाने फ्लॅट जप्तीचा दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला आदेश रद्द करून याचिका निकालात काढली असे वृत्त दैनिक गोमन्तक वृत्तसंस्थेने दिले आहे.
श्रीकृष्ण ओअर कॅरियर्स या कंपनीत कामाला असलेल्या याचिकादार दीपाली ऊर्फ सुधा गोवेकर हिच्या पतीचा 2004 मध्ये अपघाती मृत्यू झाला होता. यासंदर्भात तिने कामगार आयोगाकडे नुकसान भरपाईसाठी कंपनीविरुद्ध अर्ज केला होता.
आयोगाने कंपनीला 3 लाख 19 हजार 600 रुपये देण्याचा आदेश 2015 रोजी दिला होता. मात्र ही रक्कम देण्यास कंपनीकडून टाळाटाळ होत असल्याने यासंदर्भात तिने मुलांसह उच्च न्यायालयात याचिका सादर केली होती.
या नुकसान भरपाईसाठीची मागणी करूनही त्याला दाद दिली जात नाही. आठ वर्षे उलटून गेल्याने ही रक्कम व्याजासह 10 लाखांपेक्षा अधिक झाली आहे. कंपनीच्या संचालकांकडून ही रक्कम देण्यास टोलवाटोलवी केली जात असल्याचे याचिकेत नमूद केले होते.