व्यवस्थापनाच्या छळाला पिळवणुकीला कंटाळून कामगारांनी उचलले संपाचे हत्यार

पिंपरी चिंचवड : पिंपरीमध्ये कार्यरत असलेली जी. के. एन. सिंटर मेटल्स या बहुराष्ट्रीय कंपनीतील सर्व कामगार दिनांक 13/7/2023 पासून संपावर आहेत. व्यवस्थापनाच्या विविध प्रकारच्या आर्थिक, शारीरिक तसेच मानसिक छळाला व पिळवणुकीला कंटाळून कामगारांना संपावर जाण्याशिवाय पर्याय नव्हता. असे कामगार संघटनेचे अध्यक्ष यांनी सांगितले.

    मागील तीन वर्षापासून व्यवस्थापन विविध कामगार विरोधी हातखंडे वापरत आले आहे. कंपनीने सरकार दरबारी केलेले सर्व अर्ज फेटाळण्यात आलेले आहेत. उदा. १९ जून २०२० रोजी ले-ऑफ साठी, दि. १४ जून २०२२ रोजी रिट्रीचमेंट साठी व दि. ०५ जानेवारी २०२३ रोजीचा केलेला क्लोजरचा अर्ज. कंपनीची आर्थिक स्थिती पूर्णपणे भक्कम व सुस्थितीत आहे हे वेळोवेळी वार्षिक ताळेबंदातून दिसून येत आहे असे वृत्त अनुवाद आपला न्यूज वृत्तसंस्थेने दिले आहे.

    पिंपरी प्लांटच्या व्यवस्थापनाच्या मनमानी कारभार व अविरत पिळवणुकीला कंटाळून 90 कामगार तुटपुंजा मोबदला घेऊन नोकरी सोडून घरी गेले आहेत. गेलेले कामगार हे त्यांना केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या दमदाटीने व शिस्तीच्या नावाखाली केला जात असलेल्या धाकाने, तुटपुंजा मोबदला घेऊन व छळाला कंटाळून नोकरी सोडून घरी गेले आहेत. मागील करारावेळी एकूण 320 कामगार पटावर होते. आता पटावर फक्त 192 कामगार शिल्लक आहेत. राहिलेल्या 192 कामगारांना नवीन पगारवाढ तर सोडाच परंतु मागील करारात ठरलेल्या गोष्टीही करार मोडीत काढून त्याचा मोबदला सुद्धा व्यवस्थापन उद्धटपणाने देत नाही. जे कामगार कमी झालेले आहेत त्या ठिकाणी शिल्लक कामगारांना दमदाटी करून त्यांच्याकडून जादाचे काम करवून घेतले जात आहे. 

    तसेच त्या ठिकाणी व्यवस्थापन नॅप्स (NAPS) व कंत्राटी कामगारांना लावून उत्पादन काढून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यात या कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न खूप गंभीर आहे. बऱ्याच ठिकाणी अपघातांच्या तसेच अकुशल ट्रेनी कामगारांकडून टूल्स तुटल्याच्या घटना घडल्या आहेत. व्यवस्थापनास वेळोवेळी या विषयावर संघटनेने सांगून सुद्धा व्यवस्थापन याबाबतीत गंभीर नसून आपला मनमानी कारभार चालूच ठेवला आहे.

    त्यातून व्यवस्थापनाच्या जाचक व अडमूठ्या भूमिकेला कंटाळून संघटनेला संपाची नोटीस देणे भाग पडले. संघटनेने आपला संप मागे घ्यावा, यासाठी संघटनेचे अध्यक्ष व जनरल सेक्रेटरी यांचे तडकाफडकी निलंबन केले आहे. असे अनेक प्रकार तीन वर्षांपासून कामगार भोगत असल्याने कामगारांना संप करण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

    आज हि वेळ GKN च्या कामगारांवर आलेली आहे, भविष्यात इतर कोणावरही येऊ शकते. म्हणून आम्ही व्यवस्थापनाच्या विरोधात हे पाऊल उचलले आहे. या आंदोलनास विविध कामगार संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. त्या संदर्भातील पत्र संघटनेला दिली जाताहेत. असे महिंद्रा सिंटर्ड कामगार संघटना, पिंपरी, पुणेचे श्री. निळकंठ शिवदास मिरजगावे व श्री. सदानंद हिरामण टिळेकर यांनी सांगीतले.