उरण : इसांबे ता. खालापूर येथील मे. डि. एस.व्ही. केमिकल्स हि कंपनी मागील नऊ महिन्यांपासून बंद होती. कामगार संघटना व व्यवस्थापन यांच्यात पगारवाढीची चर्चा असफल झाल्यामुळे कामगारांनी कामबंद केले होते. नऊ महिने कंपनी बंद असल्यामुळे पगार नाही, कामगारांना उत्पन्न नाही त्यामुळे कामगार अस्वस्थ झाले व कामगारांनी कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांची भेट घेऊन आपण कंपनी सुरु करण्यासाठी आम्हांस सहकार्य करावे अशी विनंती केली.
कामगारांना न्याय देण्यासाठी नेहमीच अग्रेसर असणारे कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी आपल्या कामगार क्षेत्रातील अनुभवाने, कंपनी व्यवस्थापनाबरोबर वाटाघाटी करून बंद कंपनीतील कामगारांना ७००० रुपये पगारवाढ करण्याचा करार दि.१० जुलै २०२३ रोजी केला व १२ जुलै पासून हि कंपनी पूर्ववत सुरु होत आहे. कामगार नेते महेंद्र घरत यांच्या जादुई मध्यस्थीने ५२ कामगारांचा रोजीरोटीचा प्रश्न मार्गी लागला यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होऊन कामगारांनी कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे मनापासून आभार मानले. कामगारांना ७००० रुपये पगारवाढ, १६८०० रुपये बोनस, परीवारासाठी मेडिक्लेम सुविधा देण्याचा करार दि. १० जुलै २०२३ रोजी करण्यात आला असे वृत्त डिजिटल पुणे न्यूज वृत्तसंस्थेने दिले आहे.
या प्रसंगी न्यु मॅरीटाईम ऍण्ड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्रशेठ घरत, सरचिटणीस वैभव पाटील, व्यवस्थापनातर्फे डायरेक्टर धनंजय साठे, गौरव साठे, फॅक्ट्री मॅनेजर प्रशांत मानकामे, कायदेशीर सल्लागार सईद मुल्ला, असीफ मुल्ला, मनीष धुतीया तर कामगार प्रतिनिधी राकेश पाटील, दिपक देवघरे, संजय देवघरे, ज्ञानेश्वर तेलंगे, मधुकर शिंदे, मनोहर देवघरे, उपस्थित होते.