कामगारांच्या हक्कांसाठी त्यांच्याबरोबर रस्त्यावर उतरू - आमदार सुनिल शेळके यांचा इशारा, जनरल मोटर्स कंपनी कामगारांचा प्रश्न विधानसभेत

मुंबई - औद्योगिक क्षेत्रातील जनरल मोटर्स कंपनीतील कामगारांचा प्रश्न अधिवेशनात उपस्थित करत आमदार सुनिल शेळके यांनी आक्रमक पवित्रा घेतला.आम्ही सत्तेमध्ये सहभागी झालो, याचा अर्थ सरकारने जो काही निर्णय घेईल, त्याचं आम्ही समर्थन करू, असं आम्हाला गृहीत धरू नका. पुढील आठवड्यात मी कामगारांसह रस्त्यावर उतरणार आहे, असा इशारा आमदार शेळके यांनी विधानसभेत देऊन टाकला.

    आमदार शेळके यांनी (मंगळवार, दि. 25) औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना जनरल मोटर्स कंपनीतील कामगारांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करत विधानसभेत सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला.

    आमदार शेळके म्हणाले की, माझ्या मावळ मतदार संघातील तळेगाव दाभाडे औद्योगिक क्षेत्रातील जनरल मोटर्स या कंपनीतील कामगार मागील अडीच वर्षांपासून न्याय व हक्कांसाठी संघर्ष करीत आहेत. नव्याने जी कंपनी तेथे येणार आहे, त्यात त्यांना रुजू करून घेण्यात यावं. यासाठी सातत्याने मागणी करत आहेत. राज्य सरकार, न्यायालय अशा ठिकाणी लढा देत आहेत. काही दिवसांपूर्वी न्यायालयाने काही निर्णय दिले ते कंपनीच्या बाजूने दिले. अशी भावना निर्माण होऊन ती कामगारांनी माझ्यापर्यंत पोहोचविण्याचे काम केले.

    आमदार शेळके पुढे म्हणाले की, जवळपास 1600 हून अधिक कामगार कंपनीत काम करतात. राज्यभरातून आलेले अडीच हजारांपेक्षा अधिक कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर काम करतात. कंपनीकडून आता सांगितले जात आहे की, आपल्याला 110 दिवसांचे व्हीआरएस पॅकेज देणार आहोत. त्यासाठी 27 जुलैपर्यंत आपण कंपनीत यावं. ॲग्रीमेंटवर सही करावी आणि आपण कंपनीतून बाहेर पडावं आणि जर तुम्ही 27 जुलै पर्यंत आला नाही तर आम्ही तुम्हाला पुढचे पॅकेज देणार नाही. अशी तंबीही कंपनीकडून कामगारांना देण्यात आली आहे.

आमदार शेळके म्हणाले, माझी मंत्रिमहोदयांना विनंती आहे की, आम्ही सत्तेमध्ये सहभागी झालो. याचा अर्थ सरकारने जो निर्णय घेईल त्याचे आम्ही समर्थन करु, असं आम्हांला गृहीत धरु नका.

पुढील आठवड्यात हे सर्व कर्मचारी आपल्या परिवाराला घेऊन रस्त्यावर उतरणार आहेत. आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत रस्त्यावर उतरणार आहोत. सरकारने यावर तातडीने निर्णय घ्यावा. अशी मागणी यावेळी त्यांनी केली.