सातपूर (नाशिक) : आशिया खंडातील पॉलीफिल्म क्षेत्रातील सर्वात मोठ्या मुंढेगाव (ता. इगतपुरी) शिवारातील जिंदाल कंपनीतील अग्नितांडवमध्ये तीन कामगारांचा मृत्यू आणि सतरा कामगार जखमी झाले. धुराचे लोळ कायम असल्याने प्रशासनाने उत्पादन बंदचे आदेश दिलेत. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय (डिश) 'ॲक्शन मोड'वर पोचला आहे असे वृत्त सकाळ वृत्तसंस्थेने दिले आहे.
कामगारांसह यंत्रसामुग्रीची सुरक्षा आणि इमारतींचे 'स्ट्रक्चरल ऑडिट' चे संकलन करण्यात येत असून 'डिश'तर्फे खटला दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. संचालनालयाच्या अधिकाऱ्यांकडून ही माहिती मिळाली. दरम्यान, कामगार आयुक्तालयातर्फे कामगारांच्या अनुषंगाने सविस्तर अहवाल सरकारला सादर करण्याची तयारी करण्यात आली होती. अशातच, स्थानिकांनी कंपनीतील ८५ कामगार बेपत्ता असल्याची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे केल्या आहेत.
कामगार आयुक्तालयाच्या तपासणीत ठेकेदारांना परवानगी असलेल्यांपेक्षा कामगारांची उपस्थिती असे विविध मुद्दे आढळल्याने जिल्हा प्रशासन गंभीर झाले आहे. त्यामुळे खटला दाखल करण्यासाठी सविस्तर अहवाल सादर करण्याचे फर्मान प्रशासनातर्फे कामगार आयुक्तालयाला देण्यात आले आहेत.
दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून औद्योगिक सुरक्षा, एन. डी. आर. एफ., एस. डी. आर. एफ., जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, पोलिस, कामगार उपायुक्तालय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, बाष्पकेसह इतर तपास यंत्रणा दुर्घटनेवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करताहेत.
आग आटोक्यात आली असली, तरीही धुराच्या लोळांसोबत रसायन उग्र दुर्गंधी परिसरात पसरत असल्याने प्रदूषणाचा धोका बळावला आहे. परिसरातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येत असल्याच्या तक्रारींच्या सोबत कंपनीच्या व्यवस्थापनाविरुद्ध आरोप स्थानिकांमधून होत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीनंतर 'डिश' ने दुर्घटनेचे मूळ शोधण्यासाठी तांत्रिक पथकाची मदत घेण्याचे ठरवले आहे.