नागपूर : अनेक कंपन्या त्यांच्याकडे काम करीत असलेल्या कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देत नसल्याच्या तक्रारींची दखल राज्य शासनाने घेतली असून आवश्यक ती कार्यवाही करण्यासंदर्भात जानेवारी महिन्यात बैठक घेणार असल्याची माहिती कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी (दि. ३० डिसेंबर) विधानसभेत दिली.
विधानसभा सदस्य गीता जैन यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली. या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री श्री. खाडे यांनी ही माहिती दिली.
मंत्री श्री. खाडे म्हणाले की, सध्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत मुंबई मेट्रो लाईन नंबर. ९ प्रकल्प सुरू आहे. त्या अनुषंगाने तेथे सुरक्षा व्यवस्थेसाठी असलेल्या कंपनीकडून सुरक्षा रक्षकांना किमान वेतन दिले जात नसल्याच्या तक्रारी आहेत. अशाच प्रकारच्या तक्रारी इतर अनेक कंपन्यांबाबत येत आहेत. त्याचीही दखल घेत याबाबत कामगार विभागाचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांची बैठक घेण्यात येईल. तक्रारींच्या अनुषंगाने आणि किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत या बैठकीत व्यापक चर्चा करण्यात येईल, अशी माहितीही मंत्री श्री. खाडे यांनी दिली.