भुवनेश्वर : ओडिशातील नवीन पटनायक सरकारनं कंत्राटी भरती धोरण हद्दपार करत क्रांतीकारी निर्णय घेतला आहे. याद्वारे त्यांनी ओडिशाच्या जनतेला मोठी दिवाळी भेटही दिली. आजचा दिवस आपल्या जीवनातील आनंददायी दिवस असल्याची प्रतिक्रियाही यावर मुख्यमंत्री पटनायक यांनी दिली असे वृत्त सकाळ वृत्तसंस्थेने दिले आहे.
मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन एक व्हिडिओ शेअर करत घोषणा केली की, राज्यात कंत्राटी रोजगार व्यवस्था कायमस्वरुपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मी बऱ्याच काळापासून या दिवसाची प्रतिक्षा करत होतो. त्यामुळं आजचा दिवस माझ्याासाठी सर्वाधिक आनंदाचा दिवस आहे. त्यामुळं आता ओडिशामध्ये कंत्राटी भरतीचं युग समाप्त झालं आहे.
५७ हजारांहून अधिक कंत्राटी कामगार होणार पर्मनंट
मुख्यमंत्री पटनायक यांनी कंत्राटी भरती संपल्याची घोषणा केल्यानंतर सध्या जे कंत्राटी तत्वावर काम करत आहेत, अशा ५७ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना नियमित करण्यात येणार असल्याचीही घोषणा केली. त्यांच्या या निर्णयामुळं राज्य सरकारच्या तिजोरीवर १,३०० कोटी रुपयांचा बोझा पडणार आहे. पटनायक यांनी आपल्या ७६ व्या वाढदिवसापूर्वी ही मोठी घोषणा केली आहे.
