सणसवाडी : सणसवाडी (ता. शिरूर) येथील इस्पात प्रोफाइल कंपनीने आपली सर्व १०५ एकरची जागा व त्यातील संपूर्ण प्लॅंट नुकताच युरेनस सॉफ्टेक पार्क या कंपनीला विकला. 'इस्पात'ने २२ वर्षांपूर्वी टाळेबंदी करून ५ हजार कामगारांना वाऱ्यावर सोडले होते. तसेच, स्थानिक ग्रामपंचायतीचा कर थकविला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार कामगारांना सन २०१५ मध्ये ६ कोटी देणे निश्चित केले होते. मात्र, ते दिलेले नाही असे वृत्त सकाळ वृत्तसंस्थेने दिले आहे.
सन १९८४ मध्ये उद्घाटन झालेल्या इस्पात प्रोफाइल या शिरूर तालुक्यातील पहिल्या पोलाद कंपनीमुळे परिसरात बरीच आर्थिक उलाढाल वाढली. मात्र, पुढील काळात सन २००० मध्ये कंपनी बंद पडली आणि सुमारे ५ हजार कामगार देशोधडीला लागले. महावितरण व स्थानिक ग्रामपंचायतीचे तेव्हापासूनचे कोट्यवधी रुपये कर थकले आहेत. कंपनीच्या विरोधात राष्ट्रवादी श्रमशक्ती महासंघ, स्थानिक ग्रामपंचायत यांनी दाद मागितली. मात्र, हे प्रकरण कोलकत्त्यातील एनसीएलटी न्यायालयात दाखल होऊन तिथे ग्रामपंचायतीला केवळ ११ हजार रुपये घ्या, असा आदेश झाला.
मात्र, कामगारांच्या लढ्यात सर्वोच्च न्यायालयापर्यंतचे सर्व निकाल कामगारांनी जिंकत सन २०१५ मध्ये कामगारांना ६ कोटी देण्याचा आदेश दिले. मात्र, कंपनीने दिवाळखोरी जाहीर करून कंपनीची विक्री २०० कोटींऐवजी १०४ कोटींना दाखवली आणि काही मोजक्या कामगारांच्या खात्यावर परस्पर २५ ते ५० हजार रुपये पाठवून कामगारांमध्ये भेद करण्याचा प्रयत्न केला. कामगार अजूनही आपल्या थकीत येण्यांवर ठाम असल्याचे राष्ट्रवादी श्रमशक्ती महासंघाचे अध्यक्ष रामा वांद्रे, सचिन भंडारे, विक्रम दरेकर, प्रवीण दरेकर, नवनाथ हरगुडे, नवनाथ दरेकर, भैरू दरेकर यांसह शेकडो कामगारांनी सांगितले. त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन शिक्रापूर पोलिसांकडे दिले. यावेळी सरपंच संगीता हरगुडे व रामदास दरेकर यांनीही बाजू मांडली.
कंपनीकडून येणे असलेल्या एकूण ५ हजार कामगारांपैकी शंभराहून अधिक कामगार निवर्तले. २२ वर्षांचा संघर्ष अजूनही काहीच मिळू देत नाही. मात्र, आम्ही ना थांबणार ना थकणार. सर्व येणी वसुल करणारच. - रामा वांद्रे, अध्यक्ष, राष्ट्रवादी श्रमशक्ती महासंघ, पुणे
