पुणे : कामगार हिताच्या विरोधातील कायदे महाराष्ट्रात लागू करू नये, कंत्राटी पद्धत बंद करावी, कायम कामगारांच्या संघटनेचे अधिकार अबाधित रहावे या व विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांनी आज दि.10 ऑगस्ट रोजी अप्पर कामगार आयुक्त कार्यालय पुणे येथे प्राणांतिक उपोषणाला सुरुवात केली आहे.
यावेळी यशवंत भोसले म्हणाले कि, केंद्र सरकारच्या नवीन कामगार कायद्यातील 2022 च्या 4 कोड मधील धोरणानुसार इंडस्ट्रियल रिलेशन मधील Fix Term Employment या घातक कायद्यामुळे पर्मनंट नोकऱ्या राहणार नसून या पुढे कंपनी मालकास 3 ते 5 वर्षांचे करारावरच कामगारास नोकरीत ठेवण्याचा अधिकार बहाल करण्यात आला आहे, त्या मूळे पर्मनंट कामगारांना सक्तीने कपात करणे, कामावरून काढून टाकणेचे काम कारखानदारांनी महाराष्ट्रात कायदा लागू होणे पूर्वीच सुरु केले आहे.
कामगार आयुक्त कार्यालय हतबल झाले असून अप्पर कामगार आयुक्त कार्यालयासमोर अशा प्रकारे अन्याय झालेले सुमारे 500 कामगार गेली एक महिना आंदोलन करत असून अप्पर कामगार आयुक्त, पुणे यांनी अनेकदा संबंधित कंपनी मालकांना बोलावून देखील ते येत नसल्याचे आम्हाला उत्तर देत असून या मालकांवर आम्ही 100 चे फौजदारी वर खटले दाखल केल्याचे कळवले आहे. मात्र कामगारास कामावर पाठवण्यास हे कार्यालय हतबल असल्याचे सांगून त्यांनी हात टेकवले आहेत असे भोसले म्हणाले.
पुढे यशवंत भोसले म्हणाले कि, नव्याने मुख्यमंत्री झालेले श्री.एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन दिले आहे. कालच केंद्रीय श्रम मंत्री मा. श्री. भूपेंद्रजी यादव साहेब यांना भेटलो परंतु त्यांनी हे केंद्राने कायदे मंजूर केले असल्याचे सांगून दोन महिन्याने पुनः भेटू असे सांगितले, परंतु हे कायदे राज्यात राबवायचे की नाही हा सर्वस्वी निर्णय राज्य शासनाचा असल्याचे कायद्यात नमूद आहे.त्या मूळे महाराष्ट्रात हे कायदे राबवू नये व कोविड मध्ये कामावरून काढलेल्या व गेली दोन महिने आंदोलनास बसलेल्या या उपासमार चालू असलेल्या कामगारांना पूर्ववत कामावर घ्यावे या करिता आज पासून अप्पर कामगार आयुक्त कार्यालय पुणे येथे " प्राणांतिक " उपोषणास सुरवात केली आहे.
तसेच सर्वाना आवाहन करताना यशवंत भोसले म्हणाले कि, राज्यातील सर्व श्रमिक, कामगार व कामगार नेते यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे व भविष्यात कामगार व कामगार चळवळ वाचवावी. या वेळी मोठ्या प्रमाणामध्ये कामगार वर्ग उपस्थित होता.