नवी दिल्ली : केंद्र सरकारने ईपीएफवरील व्याजदरात (EPF Interest rate)कपात केली आहे. 2021-22 या वर्षासाठी आता 8.1 टक्के व्याज मिळणार आहे. ईपीएफच्या व्याजदरात कपात केली जाऊ शकते, अशी चर्चा आधीच सुरू झाली होती. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याजदर 8.5 टक्क्यांवरून 8.1 टक्क्यांवर आणण्याच्या ईपीएफओ (EPFO) बोर्डाच्या प्रस्तावाचे समर्थन केले होते. त्या म्हणाल्या होत्या की 40 वर्षांपासून व्याजदर कमी केले गेलेले नाहीत आणि नव्याने कमी केलेले दर आजचे वास्तव दर्शवते. इतर अल्पबचत योजनांवरील व्याजदर आणखी कमी आहेत.
पीएफवर (Provident Fund) मिळणारे व्याज डिसेंबर महिन्याच्या आधीच खात्यात जमा केला जाऊ शकतो. वित्त मंत्रालयाने मंजुरी दिल्यानंतर कधीही इपीएफओ सदस्यांच्या पीएफ खात्यात व्याज जमा केला जाऊ शकतो.
सर्वात नीचांकी व्याजदर
ईपीएफओने २०२१-२२ साठी पीफसाठीचा व्याजदर ८.१ टक्के केला आहे. विशेष म्हणजे १९७७-७८ नंतरचा पीएफवरील सर्वात कमी व्याजदराची नोंद करण्यात आलीय. यापूर्वी २०२०-२१ मध्ये ८.५ टक्के व्याजदर मिळत होता.२०२०-२१ या वर्षात पीएफच्या व्याजदरात कोणताही बदल केला नव्हता. तर त्याआधी २०१९-२० साठी या ८.६५ टक्के हा व्याजदर कमी करुन ८.५ टक्क्यांवर आणला होता.