राज्यातील कामगार वर्गाच्या हितास सर्वोच्च प्राधान्य : कल्याण आयुक्त रविराज इळवे

राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी दिली माहिती

मुंबई / कोल्हापूर : सोमवार दिनांक २३ मे २०२२ रोजी राज्य गुणवंत कामगार असोसिएशन यांचेवतीने राज्यातील कामगार वर्गाच्या विविध मागण्यांस अनुसऊन कल्याण आयुक्त - महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, मुंबई यांचे समवेत मध्यवर्ती कार्यालयात पूर्व नियोजित मीटिंग आयोजित करणेत आलेली होती.

         सुमारे अडीच तासाहून जास्त वेळ चाललेल्या या मिटींगमध्ये, राज्य गुणवंत कामगार असोसिएशन यांचेवतीने सुरुवातीपासून ते आज अखेरपर्यंत केलेल्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने अभ्यासपूर्ण व महत्त्वपूर्ण मांडणी करून त्यावरती सखोल चर्चा करण्यात आली. सदर चर्चेच्या दरम्यान राज्य व केंद्र शासनाच्यावतीने दिले जाणारे पुरस्कार व त्या अनुषंगाने दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा आदींची महत्त्वपूर्ण चर्चा व विवेचन करणेत आले.

          यावेळी असोसिएशनच्या वतीने करणेत आलेल्या मागणींच्या अनुसंगाने अनेक विषयांवर अंतिम निर्णय घेणेत आले. त्यावरती मंडळाच्यावतीने त्वरीत कार्यवाही देखील सुरू करणेत आलेली आहे.सदर चर्चेवेळी प्रशासन व गुणवंत कामगार असोसिएशन यांनी अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल व अभ्यासपूर्ण सकारात्मक चर्चा केल्या.

         यावेळी मंडळाचा शासनाकडून थकित निधी व त्याबाबतीत अपेक्षित मते, त्याचबरोबर भविष्यातील विविध योजना व उपक्रम तसेच औद्योगिक कामगार व त्यांच्या समस्या यावरती दोन्ही बाजूकडून अपेक्षित मते व त्यास अनुसरून राज्यातील कामगार व गुणवंत कामगार यांना सोई सुविधा देणेबाबत निर्णायक व अभ्यासू चर्चा करणेत आल्या. यावेळी सर्वच बाबतीत कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, अपेक्षित कार्यवाही करणेबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

         तसेच कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी मंडळाच्या कल्याण आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यापासून, मंडळावरती कोणताही आर्थिक भार न पडता, विविध संस्थाच्या माध्यमातून केलेली कोट्यावधी रुपयांच्या कामांची इत्यंभूत माहिती दिली. आजअखेर मंडळामध्ये ज्या सुधारणा केल्या गेल्या आहेत, त्याची असोसिएशनच्या वतीने प्रत्यक्ष जागेवरती जावून पाहणी करणेत आली.

         नक्कीच आज अखेरचा मंडळाच्या प्रमुख अधिका-यांचा आलेख पाहिला असता, कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी राज्यातील कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात कोठेही कसूर न ठेवलेचे दिसून आले. त्याबददल राज्य गुणवंत कामगार असोसिएशन यांचेवतीने त्यांचा सत्कार करून, राज्यातील कामगार वर्गाच्यावतीने कृतज्ञता व ऋण व्यक्त केले. यावेळी कल्याण आयुक्तांनी वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून कामगार व त्यांचे कुटुंबिय यांचेसाठी अनेक नाविण्यपूर्ण उपक्रम आयोजित करणार असलेबाबत निसंदिग्ध ग्वाही दिली.

         यावेळी प्रशासनाच्या वतीने कल्याण आयुक्त रविराज इळवे, कार्यक्रम शाखेच्या सहा. कल्याण आयुक्त माधवी सुर्वे , संगणक विभागाचे सहा. कल्याण आयुक्त प्रमोद चौधरी तसेच असोसिएशनच्यावतीने अध्यक्ष सुरेश केसरकर, उपाध्यक्ष केरबा डावरे, दत्तात्रय मुळीक, प्रभाकर कांबळे, धनंजय पाटील व  संजय कदम आदिंनी प्रातिनिधीक स्वरूपात सदर मिटिंगमध्ये सहभाग घेतला. अशी माहिती आमच्या प्रतिनिधीशी बोलताना राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी दिली.