अमरावती : अकुशल आणि मर्जीतील कामगारांना वेतनवाढ देऊन कुशल कामगारांना मात्र या वेतनवाढीपासून दूर ठेवण्यात आल्याने प्रकल्पग्रस्त कामगारांनी या अन्यायकारक वेतनवाढ संदर्भात टोकाची भूमिका घेतली. कामगार आयुक्तांना याबाबत निवेदनही सादर करण्यात आले.
रतन इंडिया ऊर्जा प्रकल्पामध्ये यावर्षी कामगारांना वेतनवाढ देण्यात आली. मात्र कुशल कामगारांच्या हाताखाली प्रशिक्षण घेणाऱ्या अकुशल मात्र अधिकाऱ्यांच्या मर्जीतील कामगारांना तब्बल आठ हजार रुपयांची वेतनवाढ देण्यात आली तर कुशल कामगारांना मात्र दमडीही देण्यात आली नाही. काही कामगारांना पाचशे रुपये ते दोन हजार अशी वेतनवाढ देण्यात आल्याने समान काम समान वेतनवाढ हा नियम याठिकाणी लागू करायचा होता मात्र अधिकाऱ्यांच्या मर्जीतील कामगारांना भरघोस वेतनवाढ आणि प्रकल्पाच्या पडतीच्या काळात पाठीशी राहणाऱ्या कामगारांना मात्र वेतनवाढी पासून वंचित ठेवल्याने संतप्त कामगारांनी कामगार आयुक्तांची भेट घेऊन निवेदन सादर केले.याप्रकरणी त्वरित तोडगा निघाला नाही तर कामगारांनी याविरोधात आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
व्यवस्थापनाशी चर्चा निष्फळ
अन्यायग्रस्त कामगार आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये दोन दिवसांपूर्वी चर्चा देखील झाली. मात्र, ती चर्चा निष्फळ ठरली. यामध्ये प्रकल्पग्रस्त कामगारांनाच अधिक टार्गेट केले असल्याचा आरोप करण्यात आला.
कामावरून काढण्याची धमकी
व्यवस्थापनाच्या वतीने आंदोलनात्मक भूमिका घेणाऱ्या कामगारांना कामावरून कमी करण्याची धमकी सुद्धा व्यवस्थापनाने दिली असून कामगार सुद्धा आपल्या मागणीवर ठाम असल्याचे कामगारांनी स्पष्ट केले. त्यामुळे रतन इंडिया प्रकल्पामध्ये संघर्ष उडण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
