कामावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा हृदयविकाराचा झटका येऊन झालेला मृत्यू सुद्धा अपघाताच - कामगार न्यायालय

औरंगाबाद : कामावर असणाऱ्या ट्र्क चालकाचा हृदयविकाराचा झटका (Heart attack) येऊन झालेला मृत्यू सुद्धा अपघाताच असल्याचा महत्वपूर्ण निर्णय कामगार न्यायालयाने दिला आहे. तसेच या ट्र्क चालकाच्या पत्नीला आणि अवलंबितास 6 लाख 77 हजार 760 रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश सुद्धा न्यायालयाने दिले आहे असे वृत्त ABP माझा वृत्तसंस्थेने दिले आहे.

    औरंगाबाद च्या सिल्लोड तालुक्यातील सासुरवाडा येथील ट्र्क चालक साहेबराव उत्तमराव सरोदे यांचा 2013 मध्ये कामावर असताना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला होता. त्यांनतर त्यांच्या पत्नी कमलबाई सरोदे यांनी ट्र्क मालक आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. यांच्याविरुद्ध कामगार न्यायालयात धाव घेत नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती.

     याबाबत अधिक माहिती अशी की, साहेबराव सरोदे आणि त्यांचा क्लिनर रोहिदास गाघणे 2 मे 2013 रोजी कर्मयोगी पाटील साखर कारखाना बिजवडी पुणे येथे साखर आणण्यासाठी गेले होते. दरम्यान सरोदे आणि त्यांच्या क्लिनरने ट्र्कमध्येच मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता ट्र्क चालक सरोदे हे कारखाना परिसरात नैसर्गिक विधीसाठी गेले. त्यावेळी त्यांचा अचानक मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करत मृतदेह उत्तर तपासणीसाठी पाठवला होता. त्यानंतर डॉक्टरांनी दिलेल्या अहवालानुसार सरोदे यांचा मृत्यू हृदयविकाराचा झटका आल्याने झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कामावर असताना ही घटना घडली असून नुकसान भरपाईसाठी मिळावी यासाठी त्यांच्या पत्नीने न्यायालयात धाव घेतली.

कंपनीचा दावा...

     सरोदे यांच्या पत्नीने 10 लाखांची मदत मिळावी म्हणून नुकसान भरपाई कायद्याअंतर्गत कामगार न्यायालयात अर्ज सादर केला होता. पण यावेळी समबंधित इन्शुरन्स कंपनीकडून स्वतःचा बचाव करण्याच्या प्रयत्न करण्यात आला. साहेबराव सरोदे यांचा मृत्यू हा नैसर्गिक असून तो अपघाती नसल्याचा दावा केला. त्यामुळे ते नुकसान भरपाईसाठी पात्र नसल्याचं सुद्धा कंपनीच्यावतीने दावा केला गेला.

सरोदेंच्या वकिलांचा दावा...

     कंपनीकडून वरीलप्रमाणे दावा केल्यानंतर सरोदे यांच्याबाजूने त्यांचे वकील संदीप बी. राजेभोसले यांनी बाजू मांडली. अपघाताच्यावेळी सरोदे ट्र्क मालक सुरेश भीमसिंग राजपूत यांच्या अपघातग्रस्त ट्रकवर ड्रायव्हर म्हणून काम करायचे. त्यांना ट्र्क मालक 10 हजार रुपये प्रतिमहिना पगार द्यायचे. सरोदे यांना हृदयविकाराचा आजार नव्हता. ट्र्क मालकाने सरोदे यांच्यासोबत दुसरा सहकारी ड्रायव्हर दिला नव्हता. सरोदे यांनाच सलग 15 तास ट्र्क चालवावा लागत होता. कामाच्या तणावामुळेच नैसर्गिक विधीला गेले असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे सरोदे यांना आलेला हृदयविकाराचा झटका हा नैसर्गिक मृत्यू नसून अपघाताच असल्याचा युक्तीवाद राजपूत यांनी केला.

न्यायालयाने दिला 'हा' निकाल

     यावेळी दोन्ही बाजू आयकून घेतल्यावर कामगार न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.एस.देशमुख यांनी महत्वपूर्ण निर्णय दिला. मृत साहेबराव सरोदे यांच्या पत्नी आणि कुटुंबास प्रतिवादी ट्र्क मालक, विमा कंपनी यांनी संयुक्तरित्या 6 लाख 77 हजार 760 रुपये मदत करण्याचे आदेश दिले. सोबतच ही रक्कम अपघात झाल्याच्या तारखेपासून 12 टक्के व्याजासह देण्याचा निर्णय सुद्धा न्यायालयाने दिला. तसेच ट्रक मालकाला 3 लाख 38 हजार 880 रुपयांचा दंड देखील सुनावला. याबरोबरच सरोदे यांचा अंत्यविधी खर्च म्हणून 50 हजार आणि नुकसान भरपाईचा अर्ज खर्चाचे 5 हजार देण्याचे आदेश दिले.

संबंधित कोर्ट आदेश - क्लिक करा