चंद्रपूर : जिल्ह्यात कोळसा आणि सिमेंट उद्योगात मोठ्या प्रमाणात स्थायी-अस्थाई कामगार आहे. तेथील कामगारांचे प्रश्न सुटले नाही. मात्र, मी असे होऊ देणार नाही. कामगारांना सोबत घेऊनच व्यवस्थापनाशी बोलणी करण्यात येईल. तुमच्या सर्व न्याय हक्कासाठी सर्वांच्या सहकार्याने लढा देऊ, असे प्रतिपादन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले असे वृत्त तरुण भारत नागपूर वृत्तसंस्थेने दिले आहे.
घुग्घुस येथे नकोडा गावात विजयक्रांती कामगार संघटनेची स्थापना आणि कामगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी विजयक्रांती कामगार संघटनेच्या अध्यक्ष शिवानी वडेट्टीवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, गडचिरोलीचे माजी नगराध्यक्ष राम मेश्राम, विजय ठाकरे आदींची उपस्थिती होती.
वडेट्टीवार म्हणाले, सिमेंट उद्योगात काम करणार्या कामगारांना किमान 21 हजार रुपये वेतन मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. ते मी मिळवून देणारच आहे. कामगारांनो विश्वास ठेवा, ही संघटना तुमच्यासाठी, तुमच्या हक्कासाठी निर्माण केली आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.