बेगुसराय, बिहार : येथे दिनांक १३ एप्रिल पासून सुरू झालेल्या चार दिवसीय अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलताना राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्राचे सचिव अविनाश दौंड यांनी देशातील सर्व राज्य संघटनांनी आता जुन्या पेन्शनचा लढा तीव्र करावा असे आवाहन केले.
या राष्ट्रीय अधिवेशनाची सुरुवात बेगुसराय येथे दिनांक १३ रोजी देशातील २३ राज्यातील ७०० प्रतिनिधी आणि बिहार मधील हजारो सरकारी कर्मचाऱ्यांच्या रॅलीने झाली. यानंतर गांधी स्टेडियम येथील जाहीर सभेत किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ अशोक ढवळे यांनी सांप्रत सरकारच्या जनविरोधी धोरणांवर कडाडून हल्ला चढवला.
दिनांक १४ रोजी सीटूचे राष्ट्रीय महामंत्री तपन सेन यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या नव उदारीकरण धोरणांचे दुष्परिणाम स्पष्ट करून खाजगी करणा विरोधात सातत्य पूर्ण संघर्षाची आवश्यकता प्रतिपादन केली. या प्रसंगी समस्तीपूरचे विधानसभा आमदार अजय कुमार यांनी सांप्रत सरकारच्या कुटनीतीला शह देण्यासाठी जन आंदोलनाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले.
या नंतरच्या प्रतिनिधी सत्रात राज्य संघटना सचिव अविनाश दौंड यांनी महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची सद्यस्थिती विषद केली. मागील तीन वर्षात मध्यवर्ती संघटनेने केलेली आंदोलने आणि कार्यक्रमांची सविस्तर माहिती दिली. यावेळी बोलताना त्यांनी जुन्या पेन्शन योजनेसाठी देशभरात तीव्र आंदोलन छेडण्यात यावे असे महत्वाचे आवाहन केले आहे. तसेच रिक्त पदे भरण्यात यावीत.कंत्राटी कामगारांना सेवेत कायम करावे या मागण्यांसाठी सुद्धा आग्रह धरला आहे.
या अधिवेशनात कर्मचारी विषयक अनेक महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात येणार आहेत. या प्रतिनिधी सत्राच्या अध्यक्षीय मंडळात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर यांनी काम पाहिले. त्यांनी या ठरावाची मांडणी उत्तम रितीने केली. अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय सुभाष लांबा आणि महासचीव ए. श्रीकुमार यांनी या अधिवेशनात अनेक महत्त्वाच्या विषयी मार्गदर्शन केले.