कामगार भारती युनियनच्या आंदोलनाला यश, वेतनवाढ संपन्न

पेण : कामगार भारती माथाडी ट्रान्सपोर्ट आणि कामगार युनियनने डोणवत येथील उत्तम गॅलवा स्टील कंपनी विरोधात कामगारांच्या वेतन वाढ व सोयीसुविधा याबाबत पुकारलेल्या काम बंद आंदोलनाला अखेर यश आले. आंदोलनाच्या अठराव्या दिवशी कंपनीने कामगारांच्या पगारात १० हजार ७०० रुपयांची वेतनवाढ केली. ५ हजार रूपये बोनसही देण्यात आला. कामगार भारती युनियन मधील ४७५ कामगारांनी आनंद व्यक्त करत कामगार भारती युनियनचे अध्यक्ष हिराजी पाटील व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले PEN टाइम्स वृत्तसंस्थेने दिले आहे.

    उत्तम गॅलवा कंपनीने मागील आठ वर्षापासून कामगारांना वेतन वाढ केली नसल्याने संतप्त कामगारांनी आपल्या न्याय हककासाठी कामगार भारती युनियनचे सदसत्व स्विकारून शांततेच्या मार्गाने घरी राहून काम बंद आंदोलन पुकारून कंपनीचे काम काज बंद पाडले होते. याची दखल घेऊन रायगड कामगार उपआयुक्त प्रदीप पवार व सह.आयुक्त सचिन चव्हाण, युनियन अध्यक्ष हिराजी पाटील,उपाध्यक्ष गौतमशेठ पाटील, तांबाटी सरपंच अनिल जाधव, हेमंत सिंग व कंपनीचे डायरेक्टर सुमित अहुजा यांच्यात झालेल्या बैठकीनंतर कंपनीने कामगारांच्या वेतनात वाढ केली.

    कंपनीने वेतन वाढ रोखली होती यामुळे कामगारांनी कामगार भारती युनियनचे अध्यक्ष हिराजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम गॅलवा कंपनी विरोधात २८ मार्च पासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले होते या आंदोलनाला कामगारांच्या एकजुटीमुळे यश आले असल्याचे युनियन अध्यक्ष हिराजी पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी त्यांच्यासह उपाध्यक्ष गौतम पाटील, हेमंत सिंग, राजन पेरवी, आदेश कडू, भूषण घोसाळकर, दीपक घरत, आदी कामगार पदाधिकारी उपस्थित होते.