हिंगणघाट : मोहता मिल कामगारांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी स्थानिक तहसील कार्यालयासमोर 24 जानेवारीपासून साखळी उपोषण सुरू केले. 7 दिवस होऊनही कामगारांच्या उपोषणाची प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही असे वृत्त तरुण भारत नागपूर वृत्तसंस्थेने दिले आहे.
बंद असलेले मोहता मिल पूर्ववत सुरू करण्यात यावे, कंपनी एन. सी. एल. टी.मध्ये गेली असून एन. सी. एल. टी. ने कंपनी सुरू करण्यात यावी, आदी प्रमुख मागण्यांकरिता कामगार अनेक दिवसांपासू संघर्ष करीत आहेत. परंतु, गिरणी अद्याप चालू करण्यात आलेली नाही. तसेच मार्च, एप्रिल व मे 2021 मध्ये केलेल्या कामाचे त्वरित वेतन देण्यात यावे, अशीही मागणी कामगारांनी केली आहे. याबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 3 महिन्याच्या आत कामगारांचे वेतन देण्यात यावे, असे आदेश दिले आहे. याची मुदत 16 डिसेंबर 2021 रोजी संपली असून गिरणी व्यवस्थापनाने कामगारांना 3 महिन्याचा पगार दिलाच नाही. सदर प्रलंबित वेतन देण्यात यावे तसेच 2020 ते 2021 वर्षाचा नियमाप्रमाणे थकीत बोनससुद्धा देण्यात यावा, आदी सर्व मागण्यांसाठी कामगारांचे साखळी उपोषण सुरू आहे.
उपविभागीय अधिकारी तसेच जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनानुसार मोहता गिरणी ही मार्च 2021 मध्ये कामगारांचे 3 महिन्याचे वेतन तथा अर्धा बोनस न देता कामसुद्धा बंद केले. तेव्हापासून कामगार बेरोजगार झाले असून, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघाने कामगारांना त्यांनी काम केलेल्या कामाचे वेतन देण्यात यावे यासाठी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठामध्ये खटला दाखल केला असता खंडपीठानेसुद्धा 3 महिन्यात कामगारांना वेतन देण्यात यावे, असा आदेश दिला. त्याची मुदत 16 डिसेंबर 2021 रोजी संपली असून कंपनी चालकांनी आतापर्यंत कामगारांना तीन महिन्याचे वेतन दिले नाही. कंपनी सुरू करण्यात येईल, असे वेळोवेळी सांगण्यात आले आहे. परंतु अद्याप कंपनी सुद्धा सुरू करण्यात आलेली नाही. मागील वर्षभरापासून कामगार वेतन मिळेल या आशेवर आहेत.
मोहता मिल साखळी उपोषणात कामगार ज्ञानेश्वर हेडाऊ, नाना पिसे, रणजीतसिंग ठाकूर, महेश वकील, प्रवीण चौधरी, पंजाब लेवडे, प्रवीण झाडे, द्वारकादास जोशी, धर्मराज बेलखेडे, रवींद्र गोडसेलवार, प्रशांत डोके, विनोद ठाकरे, श्रीराम पिसे, संजय गंधेवार, रामेश्वर लाकडे, गजानन डोंगरे, प्रभाकर शेंडे, रामनारायण पांडे, शेख नसीर शेख दादामिया, महेश दुबे, दिलीप चौधरी, प्रकाश बुटले, राजकुमार खोब्रागडे, अजय देवढे, टीकमचंद चव्हाण, राजेंद्र कुसुरकर, राजू वैरागडे, शब्बीर मिर्झा, मोहन पोकले, प्रल्हाद मेसरे, ज्ञानेश्वर अंड्रस्कर आदी कामगार सहभागी झाले आहेत.