भवानीनगर (ता. इंदापूर) : येथील छत्रपती कारखान्यातील कामगारांनी तीन थकलेले पगार, सोसायटीची थकीत रक्कम व रिटेन्शनच्या मुद्द्यावर (दि.२० ऑक्टोबर) अचानक संपाची भाषा करीत धरणे धरले. जोपर्यंत संचालक मंडळ येऊन निर्णय घेत नाही, तोवर येथून न हटण्याचा व काम सुरू न करण्याचा पवित्रा त्यांनी घेतला. यानंतर कारखान्याच्या संचालकांनी येऊन कामगारांशी चर्चा केली व सामोपचारातून कामगारांनी संप मागे घेत काम सुरू केले असे वृत्त महान्यूज Live वृत्तसंस्थेने दिले आहे.
कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. अशातच सकाळी आठ वाजता अचानक कामगार संपावर गेले. त्यांनी कारखान्याच्या गोदाम व जुन्या मिलशेजारीच बसकन मारली. तात्यासाहेब चोपडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी यासंदर्भात आक्रमक भूमिका घेतली होती.
या कामगारांनी आपल्या प्रलंबित पगाराबाबत त्वरीत निर्णय घ्यावा अशी आग्रही भूमिका घेतली. कामगार बसलेले असल्याची माहिती मिळताच कारखान्याचे संचालक रणजितसिंह निंबाळकर, ज्येष्ट संचालक अॅड.लक्ष्मण शिंगाडे, राजेंद्र गावडे आदी संचालकांसह कार्यकारी संचालक अशोक जाधव तेथे आले.
त्यानी कामगारांशी चर्चा केली. सामोपचाराने व योग्य पध्दतीने मागण्यांवर निर्णय घेण्याचे आश्वासन संचालकांनी दिले. यामध्ये तीन प्रलंबित पगारांपैकी ऑगस्ट महिन्यातील पगार त्वरीत खात्यावर जमा करण्याचा, बोनससंदर्भात संचालक मंडळाच्या बैठकीत विचार करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी कामगारांना दिले. त्यानंतर कामगारांनी हा संप मागे घेतला.