टाटा स्टील व टाटा वायर मध्ये कर्मचाऱ्यांना मिळणार भरघोस बोनस

मुंबई : श्रमिक उत्कर्ष सभेची जबाबदारी स्वीकारल्यानंतर संघटनेचे अध्यक्ष प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी टाटा समूह व्यवस्थापनाबरोबर (Tata Group Management) यशस्वी वाटाघाटी केल्या आहेत. त्याद्वारे टाटा स्टील (Tata Steel) व टाटा वायर (Tata Wire) मधील कामगार व कर्मचाऱ्यांना 75 हजार रुपयांपर्यंत दिवाळी बोनस मिळेल असे वृत्त सकाळ वृत्तसंस्थेने दिले आहे.

     अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यावर लाड यांना मिळालेले हे पहिलेच मोठे यश आहे. लाड तसेच श्रमिक उत्कर्ष सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच मे. टाटा स्टील आणि मे. टाटा वायर यांच्या व्यवस्थापनाशी बैठक घेऊन वाटाघाटी केल्या. यावेळी संघटनेचे सरचिटणीस जितेंद्र अण्णा कांबळे आणि इतर पदाधिकारीही उपस्थित होते. टाटा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत ठरल्यानुसार नवीन बोनस करारावर सह्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार कर्मचाऱ्यांना 75 हजार रुपयांपर्यंत बोनस मिळणार आहे.

     या कराराबाबत टाटा समूहातील कर्मचारी आणि कामगारांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी लाड आणि श्रमिक उत्कर्ष सभेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. "कोरोनाच्या या अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक अशा काळातही आम्ही यशस्वी वाटाघाटी करू शकलो याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे. सकारात्मक प्रतिसाद देत कामगार हिताचा निर्णय घेतल्याबद्दल आम्ही टाटा व्यवस्थापनाचेही आभार मानतो," असेही लाड यांनी सांगितले.