दि.20 ऑक्टोबरला मुंबईत धरणे आंदोलन
पुणे : विविध मागण्यांसाठी वीज कंत्राटी कामगार संघाच्या (संलग्न भारतीय मजदूर संघ) वतीने आज (दि.11) पुण्यात निदर्शने करण्यात आली. रास्ता पेठेतील महावितरण कार्यालयासमोर ही निदर्शने करण्यात आली असे वृत्त एमपीसी न्यूज ने दिले आहे.
कंत्रीटी कामगारांच्या रखडलेल्या विविध मागण्यासाठी येत्या 20 ऑक्टोबरला मुंबई येथील वीज कंपनीच्या मुख्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करणार असल्याचे संघाने म्हटले आहे.
याबाबत संघाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उर्जामंत्री नितीन राऊत, उर्जा (राज्यमंत्री) प्राजक्त तनपुरे, कामगार आयुक्त, प्रधान सचिव उर्जा दिनेश वाघमारे, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांना निवेदन देण्यात आले आहे.
वीज उद्योग हा अत्यंत धोकादायक असा उद्योग असून आय.टी.आय चे मार्क ग्राह्य न धरता दहावीच्या मार्कवर मेरिट लिस्ट लावली जाते हे अत्यंत चुकीचे असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. तसेच, हजारो कंत्राटी कामगारांनी या नियमित रिक्त पदावर मागील दहा ते वीस वर्षे अल्प वेतनात सेवा दिली असून यांचा अनुभव ग्राह्य धरून यांनाच प्राधान्याने सामावून घ्यावे. भरतीमध्ये विशेष आरक्षण द्यावे, वयात सवलत द्यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दरम्यान, आज संघाच्या वतीने ऊर्जा विभाग व वीज कंपनी प्रशासनाच्या निषेधार्थ राज्यभरातील वीज कंपनीच्या विविध कार्यालयासमोर संघटना द्वार सभा घेऊन निषेध नोंदवला. शासनाने वीज कंत्राटी कामगारांच्या मागण्यांवर तोडगा काढावा अशी मागणी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष निलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे, कार्याध्यक्ष उमेश आनेराव, संघटनमंत्री राहुल बोडके व कोषाध्यक्ष सागर पवार यांनी केली आहे.
यावेळी अखिल भारतीय बिडी मजदूर महासंघाचे सरचिटणीस उमेश विस्वाद यांनी व कंत्राटी कामगार संघ पुणे जिल्हा सचिव सुमित कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.