संप मोडून काढण्यासाठी ACGL कंपनीचे प्रयत्न

पिसुर्ले: गेल्या साडेतीन वर्षांपासून होंडा भुईपाल परीसरात असलेल्या एसीजीएल कंपनी (ACGL Company) कामगार संघटनेचे वतीने कंपनी व्यवस्थापनाकडे सादर केलेल्या पगार वाढ कराराचा तीढा सुटत नसल्याने शेवटी कामगारांनी कायदेशीर मार्गांचा अवलंब करून कंपनीला सुमारे 15 दिवसांपूर्वी संपाची नोटीस दिली होती, त्यानुसार उद्या दि 18 ते 22 रोजी पर्यंत कंपनीच्या दोन्ही विभागांतील कामगार संपावर जाणार आहेत (ACGL workers strike) , मात्र नोटीस दिल्यानंतर कंपनीच्या व्यवस्थापनाने कोणताच तोडगा न काढता, वरून कंपनीच्या दोन्ही विभागांत काम करणाऱ्या कंत्राटदारांना कामावर येण्याची ताकिद देऊन सदर संप मोडीत काढण्याची प्रयत्न कंपनी करत असले बाबत वृत्त दैनिक गोमन्तक वृत्तसंस्थेने दिले आहे.

      या भागाचे विद्यमान आमदार तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या दुरदृष्टी कोनातून सुमारे 32 वर्षांपूर्वी येथे एसीजीएल कंपनीची स्थापना झाली होती, त्यामुळे सत्तरी तालुक्या बरोबर राज्यातील इतर भागातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या होत्या, त्यामुळे एसीजीएल कंपनी ही सत्तरीच्या विकासातील एक महत्त्वाचा घटक असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या कंपनीतर्फे निर्माण होणाऱ्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बसेस मुळे होंडा, भुईपाल या बरोबरच बस उत्पादनातील एक उत्कृष्ट कंपनी म्हणून गोव्याचे नाव सुद्धा देशात तसेच देशाबाहेर पोचले होते. 

     परंतु कंपनीच्या बदलेल्या व्यवस्थापन धोरणामुळे कामगारांनी सादर केलेल्या पगार वाढीचा मुद्दा कंपनीने फेटाळून वाढत्या महागाईच्या काळात कमी पगार वाढ देण्याचा निर्णय घेतल्याने सुमारे साडेतीन वर्षे कामगार आणि कंपनी व्यवस्थापन यामध्ये चाललेला वाटाघाटीचा मुद्दा संपुष्टात आल्याने कामगारांना नाइलाजाने संपाचे हत्यार उभारावे लागले असे कंपनीच्या दोन्ही कामगार संघटनेने या संपाचे समर्थन करताना स्पष्ट केले आहे.