चंद्रपूर : जिल्ह्यातील सर्वात जुना आणि प्रतिष्ठेचा उद्योग बल्लारपूर पेपर मिलने आपल्या कर्मचार्यांना यंदाच्या त्रिवार्षिक करारात भरघोस पगार वाढ दिली असून, अस्थायी कर्मचार्यांना काही नव्या योजनाही देऊ केल्या आहेत असे वृत्त तरुण भारत नागपूर वृत्तसंस्थेने दिले आहे.
यासाठी कामगार नेता तथा माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. मजदूर सभा व बिल्ट बल्लारपूर व्यवस्थापनामध्ये झालेल्या त्रिवार्षिक (जुलै 2020 जून 2023 ) वेतन करारात थकबाकी पोटी 10 कोटी 43 लाख, 46 हजार 930 रुपये कर्मचार्यांना मिळेल. शिवाय एकूण 3500 कामगारांना मोठ्या प्रमाणात वेतन वाढ दिली जाणार असल्याने कर्मचार्यांमध्ये उत्साह आहे.
याबाबत चंद्रपूर प्रेस क्लबमध्ये झालेल्या पत्रपरिषदेत युनियनचे महासचिव वसंत मांढरे यांनी सांगितले की, नरेश पुगलिया यांच्या प्रयत्नाला यश आले असून, स्थाई कामगारांना 5,15,70,660 रूपये, कंत्राटी व डेलीपेड कामगारांना 5,27,76,270 रूपये असे 10,43,46,930 रूपयांची थकबाकी दिली जाणार आहे. कोरोना काळात संपूर्ण देशात टाळेबंदी होती. अशावेळीसुध्दा पुगलिया यांच्या नेतृत्वात बल्लारपूर पेपर मिल कामगारांना वेतन देण्यात आले. बि.पी.एम. मजदूर सभा यांच्या अध्यक्षतेखाली 15 सप्टेंबर रोजी 2020-2023 त्रिवार्षिक करार झाला. या चर्चेत बल्लारपूर व्यवस्थापनाचे सीओओ निहार अग्रवाल, युनिट हेड उदय कुकडे, एच. आर. उपाध्यक्ष रणजी अब्राहम, जि. एम. एच. आर. प्रविण शंकेर, डिजि एम. एच. आर. अजय दुरागकर, वसंत मांढरे, युनीयनचे उपाध्यक्ष तारासिंग कलसी, कोषाध्यक्ष रामदास वाग्दरकर, सह सचिव विरेंद्र आर्य, सुभाष माथनकर, संघटन सचिव अनिल तुंगीडवार, गजानन दिवसे, आशिष मोहता, के. व्हि. रेड्डी, राजेन्द्र शुक्ला, सुदर्शन पुली यांनी भाग घेतला.
या करारात 788 स्थायी कामगारांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष वाढ मिळून 3972 रुपये व कमाल 5080 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
डेली पेड 102 कामगारास व कंत्राटी कामगार 2527 असे एकूण 2629 कामगारांना पहिल्या, दुसर्या व तिसर्या वर्षी अनुक्रमे रुपये 45 रुपये, 47.50 रुपये व 50 रुपयाप्रमाणे प्रतिदिवस वाढ करण्यात आली आहे.
तर स्थायी कामगारांना 15 महिन्याची थकबाकी रुपये 5,15,70,660 दिले जाईल. तसेच कंत्राटी कामगारांना 5,27,76,270 रूपये तसेच मुलीच्या लग्नाकरिता रुपये 75 हजार रूपये कर्ज स्वरुपात देण्यात येईल. उच्च शिक्षणासाठी 16 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचेही यावेळी ठरले.
कन्या समृद्धी योजने अंतर्गत 10,000 रूपये व्यवस्थापन व 10,000 रुपये कर्मचारी मुदत ठेव बचत करण्याचे ठरले. कामगार अपघात विमा मर्यादा रुपये 5 लाखावरुन रुपये 7 लाख करण्यात आले. कोरोना महामारीमुळे मृत्यू झालेल्या कामगारांना आर्थिक मदत देण्याचेही ठरले. या घोषणेने सर्व कामगारात उत्साहाचे वातावरण होते फटाके फोडून पेढे वाटप करून आनंद व्यक्त केल्याचेही वांढरे यांनी सांगितले.
