वीज बिल वसुली करणारेच वेतानापासून वंचित

पुणे : महावितरण कंपनीतील कोथरूड विभागातील सुमारे ७० कंत्राटी कामगारांचे माहे मे व जून २०२१ चे वेतन अद्याप झाले नाही. 

सध्या कोविड काळ असून कामगारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. महावितरणच्या थकीत वीज बिलापोटी करोडो रूपयांची वसुली करणाऱ्या कामगारांनाच वेतना पासून वंचित रहावे लागत असल्याने दिव्याखाली अंधार अशी अवस्था आहे.

अनेक कामगार व त्यांचे कुटुंबीय बाधित झाले, अनेकांचे नातेवाईक मरण पावले त्या मुळे या कंत्राटी कामगारांना मोठया आर्थिक व मानसिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

कंत्राटी कामगार हे अल्प वेतनावर गेल्या अनेक वर्षांपासून कामावर आहेत.या तुटपुंज्या वेतानावर सद्यस्थितीत कुटुंबाच्या किमान गरजा भागविणे अत्यंत अवघड झाले आहे. कंत्राटी कामगार मात्र एकनिष्ठतेने महावितरण ची करोडो रुपयांची वसुली करत असताना याच कामगारांना वेतन न मिळणे ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे.

थकीत वेतन ११ जुलै २०२१ पर्यंत सदर एजन्सी अथवा प्रमुख नियोक्ता यांच्या कडून सर्व कामगारांना प्राप्त न झाल्यास नाईलाजास्तव सर्व कंत्राटी कामगार सोमवार १२ जुलै २०२१ पासून कोथरूड विभागीय कार्यालय एस.एन.डी.टी.कॉलेज समोर कर्वेरोड, कोथरूड. या कार्यालयात एकत्र येऊन प्रशासनाच्या विरोधात निषेध व्यक्त करत वेतन होई पर्यंत धरणे आंदोलन करणार आहेत.असे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने ( संलग्न भारतीय मजदूर संघ) कळविलेले आहे.