बांधकाम कामगारांची नोंद करताना लागणाऱ्या कागदपत्रासाठी ग्रामसेवक अडवणूक करतात त्यामुळे कामगारांना नाहक त्रास होत असून याबाबत लवकर कार्यवाही करावी अशी मागणी परिवर्तन संघटना व काँग्रेस यांच्या वतीने देण्यात आले यावेळी कामगार नेते संजय पाटील उपस्थित होते.
बांधकाम कामगार नोंदणी करत असताना फॉर्म वरती ग्रामसेवक यांची सही व शिक्का आवश्यक आहे. सदर नोंदणीसाठी बरेच ग्रामसेवक शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरती बांधकाम कामगार असल्याची अॅफिडिव्हीट करून मागत असून बांधकाम कामगारांना फॉर्म वरती सही व शिक्का देण्यास नकार देत आहेत, त्यामुळे बांधकाम कामगार नोंदणी करण्यास अडचण निर्माण होत आहे.
शासन परिपत्रकानुसार ग्रामीण भागाकरिता ग्रामसेवक यांना बांधकाम कामगारांचा ९० दिवसांचे काम केल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमले आहेत परंतु संबंधित ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगारांची अडवणूक होत असून 'आम्हाला वरून आदेश नाहीत' असे सांगून बांधकाम कामगारांची बोळवण केली जात आहे. बांधकाम कामगारांचे हेलपाटे बंद व्हावेत तसेच ग्रामसेवकांना बांधकाम कामगारांना नोंदणी साठी लागणारी सही व शिक्का देण्याबाबत योग्य ते मार्गदर्शन करून कामगारांचा होणारा आर्थिक व मानसिक त्रास थांबवावा या मागणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या कडे निवेदन देण्यात आले तसेच ग्रामसेवकांना तातडीने लेखी आदेश द्यावेत अन्यथा महसूल कार्यालय बंद पाडण्याचे आंदोलन करावे लागेल असा इशारा संजय पाटील यांनी दिला.
यावेळी निवेदन देताना अनिल कवाळे, संग्राम जाधव, प्रकाश पाटील, अभिजीत सुतार, रियाज जैनापुरे, प्रकाश पोवार, वैभव चौगुले, परवेज सय्यद, ओंकार हिरवे, हुसेन खतीब, सुरेश पाटील, रवींद्र जाधव उपस्थित होते.