बांधकाम कामगारांसाठी १७ जिल्ह्यात सुरु करण्यात येत असलेल्या मध्यान्ह भोजन योजनेचा कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कोल्हापूर मध्ये शुभारंभ
कामगारांच्या कल्याणासाठीच्या योजना सुरु करण्यासाठी प्रयत्नशील
कोल्हापूर : गर्भवती महिला कामगारांना गर्भधारणेच्या शेवटच्या सहा महिन्याकरता अनुदान देणे, बांधकाम कामगाराला कोरोना झाल्यास औषधोपचाराच्या खर्चासाठी अर्थसहाय्य देणे, कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना अर्थसहाय्य देणे व बांधकाम साइटवर काम करताना कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना अर्थसहाय्य देण्याच्या दृष्टीने त्यांच्यासाठी विमा योजना सुरु करणे अशा कामगार कल्याणासाठीच्या योजना सुरु होण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
कामगार विभाग तसेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कामगार सुविधा केंद्राचे उद्घाटन व बांधकाम कामगारांसाठी १७ जिल्ह्यात शहर व ग्रामीण भागात सुरु करण्यात येत असलेल्या मध्यान्ह भोजन योजनेचा कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कोल्हापूर मध्ये शुभारंभ झाला. यावेळी श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना भोजनाचे ताट देऊन योजनेची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाला आमदार चंद्रकांत जाधव, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव श्री. चु. श्रीरंगम, अपर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ, सहाय्यक कामगार आयुक्त संदेश आयरे, जिल्हा कामगार अधिकारी यशवंत हुंबे, राहुल तोडकर, क्रेडाई, कोल्हापूरचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, सचिव प्रदीप भारमल, उद्योगपती अजयसिंह देसाई, कामगार प्रतिनिधी भरमा कांबळे आदी उपस्थित होते.
कामगार मंत्री मुश्रीफ म्हणाले, बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून बांधकाम कामगार व त्यांच्या पाल्यांसाठी अनेक चांगल्या योजना राबविण्यात येत आहेत. इमारत व इतर बांधकामा अंतर्गत ९० दिवस काम केलेल्या कामगारांची नोंदणी या मंडळाकडे केली जाते. यातून १८ ते ६० वयोगटातील कामगारांना विविध योजनांचा लाभ दिला जातो.
दगड काम, फरशी काम, रंगकाम, सुतारकाम, नाले बांधणी, प्लंबिंग, विद्युत काम, स्वयंचलित जिल्ह्यांचे जिन्यांचे काम, फॅब्रिकेशन काम, विटांचे व कौलांचे काम, सौर ऊर्जेशी निगडित काम, उद्यानातील कारंजे व पदाचारी पथ आदी बांधकामाशी संबंधित २१ कामांचा समावेश बांधकाम कामगार म्हणून करण्यात आला आहे.
कोरोना काळात कामगारांना भोजन उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने ५ जिल्ह्यात असणाऱ्या या योजनेची आजपासून १७ जिल्ह्यात सुरुवात होत आहे, असे सांगून या योजनेचा लाभ अधिकाधिक कामगार व त्यांच्या कुटुंबियांनी करुन घ्यावा, असे आवाहन श्री. मुश्रीफ यांनी यावेळी केले.
आमदार चंद्रकांत जाधव म्हणाले, शासनाने बांधकाम कामगारांसाठी लागू केलेल्या योजनांमुळे कामगारांच्या जीवनात परिवर्तन घडून त्यांची आर्थिक उन्नती होण्यास मदत होत आहे. कामागारांना सुरक्षा देण्यासाठी मंडळाने सुरु केलेल्या योजनांचा बांधकाम कामागारांनी लाभ घ्यावा. मध्यान्ह भोजन योजना सुरु झाल्याने बांधकाम कामगारांना आता चांगल्या प्रतीचे भोजन कामाच्या ठिकाणी मिळणार आहे. बांधकाम कामगारास मंडळामार्फत विमा कवच मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
श्री. श्रीरंगम म्हणाले, मध्यान्ह भोजन योजनेचा लाभ बांधकाम कामगारांनी घ्यावा. यावेळी त्यांनी बांधकाम मंडळामार्फत कामगारांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली. बांधकाम कामगारांनी आपली नोंदणी ऑन लाईन करुन मंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा. मंडळामार्फत सर्व प्रकारच्या बांधकामाशी निगडित २१ प्रकारच्या कामांचा समावेश मंडळामार्फत नोंदणीसाठी करण्यात आला आहे. मंडळामार्फत बांधकाम कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा योजना, शैक्षणिक योजना, आरोग्य विषयक योजना, आर्थिक योजना अशा विविध योजना राबविण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
कामगार संघटनेचे प्रतिनिधी श्री. कांबळे यांनी मनोगतामध्ये कामगारांसाठी मध्यान्ह भोजन योजना सुरु केल्याबद्दल व कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी विभाग प्राधान्य देत असल्याबद्दल विभागाचे व मंत्री महोदयांचे आभार मानले. तसेच मध्यान भोजन योजना प्रत्येक गावात पोहचवावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
क्रेडाईचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांनी कामगार विभागाने सुरु केलेल्या मध्यान्ह भोजन योजनेचे कौतुक केले. तसेच ही योजना सर्व कामागारांपर्यंत पोहचविण्यासाठी क्रेडाईमार्फतही प्रयत्न केले जातील, असे सांगितले.
कामगार सुविधा केंद्राचे उद्घाटन
कोल्हापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या प्रशासकीय सोईच्या दृष्टीने कोल्हापूर मधील मार्केट यार्ड या ठिकाणी बांधकाम कामगार सुविधा केंद्र सुरु करण्यात आले आहे. या सुविधा केंद्राचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी कोनशिलेचे अनावरणही श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. याठिकाणी सुरु होत असलेल्या सुविधा केंद्र कार्यालयाची पाहणी करुन बांधकाम कामगारांच्या सोयीसाठी विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या सूचना श्री. मुश्रीफ यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.