पिंपरी : कोरोना महामारीत काम करणा-या कोणालाही कामावरुन कमी करु नका. त्यांना कायमस्वरुपी कामावर घ्यावे असे केंद्र, राज्य सरकाराचे आदेश असताना पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने त्याउलट भूमिका घेतली आहे. वायसीएम रुग्णालयातील चतृर्थ श्रेणीतील 217 कंत्राटी कर्मचा-यांना महापालिका 1 ऑगस्टपासून बेरोजगार करणार आहे. या निर्णयाला तातडीने स्थगिती द्यावी; अन्यथा न्यायालयीन लढाई लढली जाईल. याशिवाय रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा, राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष, कामगार नेते यशवंत भोसले यांनी (दि.30 जुलै) पत्रकार परिषदेत दिला असे वृत्त MPC न्युज ने दिले आहे.
याबाबतची माहिती देताना यशवंत भोसले म्हणाले, महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील कॉरीडॉर, अंतर्गत, बाह्य परिसरातील रस्ते, गार्डन, डक्ट, ड्रेनेज लाईनची साफसफाई तसेच रुग्णांची सुश्रुषा, नर्सेस, डॉक्टरांना मदत आदी कामे 217 कंत्राटी कर्मचा-यांमार्फत केली जात होती. 2005 पासून सुमारे 16 वर्षे ते कर्मचारी काम करत आहेत. कोरोना महामारीच्या काळात रुग्णांची रक्ताची नाती देखील दूर जात असताना कोरोना समर्पित वायसीएमएचमध्ये या चतृर्थ श्रेणीतील कर्मचा-यांनी आपला जीव धोक्यात घालून काम केले.
महापालिकेने 22 जुलै रोजी वायसीएममधील सफाईचे काम श्री कृपा सर्व्हिसेस यांना दिले. 1 ऑगस्टपासून कामाची वर्क ऑर्डर दिली. पूर्वीच्या कामगारांना 20 ते 21 हजार रुपये वेतन दिले जात होते आणि हा कंत्राटदार महिना 10 ते 12 हजार रुपये वेतन देणार आहे. कामावर 165 कामगारच ठेवणार आहे. नवीन कंत्राटदार कमी वेतनात काम करणार असल्यामुळे महापालिकेने त्यांना काम देऊन समान काम समान वेतन या कायद्याचे उल्लंघन केले आहे. पालिकेने कुशल, अर्धकुशल, अकुशल कामगारांचे वेतन निश्चित केले आहे. त्यानुसार 20 ते 21 हजार रुपये वेतन कंत्राटी कर्मचा-यांना दिले जाते. असे असताना महापालिकेने स्वत:च्या निर्णयात बदल केला आहे. समान काम समान वेतन या न्यायालयाच्या आदेशाचेही उल्लंघन केले.
याबाबत भोसले यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेतली. त्यांच्यासमोर कामगारांची बाजू मांडली. सविस्तर चर्चा केली. नव्या कंत्राटाला स्थगिती देण्याची मागणी केली. आयुक्त राजेश पाटील यांनी सर्व तपासून पाहून निर्णय घेतो, असे आश्वासन दिले आहे.
नव्या निविदेला आयुक्तांनी स्थगिती द्यावी. 217 कंत्राटी कर्मचा-यांना यापुढेही कामावर कायम ठेवावे. अन्यथा महापालिका प्रशासनाच्या विरोधात न्यायालयीन लढा लढण्यात येईल. न्यायालयाच्या निर्णयाच्या अवमान केल्याप्रकरणी याचिका दाखल करण्यात येईल. तसेच 1 ऑगस्टपासून रस्त्यावर उतरुन कामगारांसह तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही भोसले यांनी दिला.
याबाबत राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष भोसले यांनी पुण्यातील कामगार उपायुक्त यांच्याकडेही दाद मागितली. त्यावर कंत्राटी कामगारांच्या वेतन, सेवाशर्तींबाबत कामगार कायद्याच्या प्रचलित तरतुदीनुसार समान काम समान वेतनाचे संरक्षण तसेच कोरोनाच्या उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये कामगारांची सेवा सलग राहील. याबाबत उचित कार्यवाही करावी. आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत नवीन निविदेला स्थगिती द्यावी , असे पत्र कामगार उपायुक्तांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिले आहे.
