PF मधून पैसे काढण्याबाबत नवे नियम, ऍडव्हान्स घेण्याची सोय

                             

सध्याच्या कोरोनाच्या काळात अनेक उद्योगधंदे बंद पडले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत किंवा अनेकांचे पगार कमी झाले आहेत. अशावेळी एम्प्लॉयी प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशननं (EPFO) आपल्या सदस्यांना मदतीचा हात दिला आहे.

ईपीएफओनं (EPFO) एक महिना किंवा त्याहून अधिक काळ बेरोजगार (Unemployed) असलेल्या आपल्या सदस्यांना अ‍ॅडव्हान्स (Advance) घेण्याची परवानगी दिली असून, ही रक्कम परत करण्याची (Non Refundable) गरज नाही.

आता सदस्य त्यांच्या भविष्य निर्वाह निधी (PF) खात्यात उपलब्ध असलेल्या एकूण रकमेच्या ७५ टक्क्यांपर्यंतची रक्कम आगाऊ घेऊ शकतात. नुकतीच ईपीएफओनं आपल्या ट्विटर हँडलवर ही घोषणा केली आहे. यामुळं बेरोजगार असलेल्या सदस्यांना अधिक आर्थिक सहाय्य मिळेल. त्याचबरोबर त्यांचं ईपीएफ खातंही सुरू राहिल्यानं निवृत्तीवेतन सदस्यत्वही कायम राहिल. ईपीएफओच्या या निर्णयानं लाखो सदस्यांना दिलासा मिळाला आहे.

ईपीएफमधून कोविड अ‍ॅडव्हान्सद्वारे पैसे काढण्याची सुविधा पूर्णपणे वापरलेली नसेल तर सदस्य नोकरी सोडल्यानंतरही कोविड अ‍ॅडव्हान्स सुविधा वापरू शकतील.

ईपीएफओच्या सूचनेनुसार, कोविड-१९ साथीच्या काळात पीएफ खातेधारकाचा मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीच्या कुटूंबाला एम्प्लॉयी डीपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स (EDLI) योजनेद्वारे जास्तीत जास्त ७ लाख रुपये मिळतील. यापूर्वी ही रक्कम ६ लाख रुपये होती, ती आता वाढवून ७ लाख रुपये करण्यात आली आहे. तर किमान रक्कम अडीच लाख रुपये कायम करण्यात आली आहे.