शिक्रापूर : सणसवाडी येथील पॉलीबॉण्ड रबर कंपनीचे कामगार घेऊन जाणाऱ्या बसला एल अँड टी फाटा जवळ बस आडवून (दि.७) रात्री दहाच्या सुमारास कामगारांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली.
याबाबत पॉलीबॉण्ड रबर कंपनीचे कामगार व कामगार संघटनेचे सभासद पोपट चव्हाण यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. शिक्रापूर पोलिसांनी सहा युवकांवर गुन्हा दाखल केले आहेत.
सणसवाडी येथील पॉलीबॉण्ड रबर कंपनीतील कामगार कंपनीच्या बस मधून रात्री दहाच्या सुमारास घरी जात होते. त्यावेळी एल अँड टी फाटा रस्त्यावर अचानकपणे आलेल्या काळ्या रंगाच्या कारमधील युवकांनी कंपनीची बस अडवली.
दरम्यान सहा युवक लाकडी दांडके, स्टॅम्प, काठ्या घेऊन बस मधील कामगारांना तुम्ही युनियन करता काय ? असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करत लाकडी दांडके व काठ्यांनी बेदम मारहाण केली. मारहाणीमध्ये कंपनीचे पोपट चव्हाण, सरदार मिश्रा, रवींद्र दळवी, सिद्धांत खैरे हे कामगार जबर जखमी झाले आहेत. तपास शिक्रापूर पोलीस करत आहेत.