राज्य कर्मचारी विमा महामंडळ (ESIC) द्वारे कामगारांसाठी कोविड सेंटर सुरु करण्याची मागणी

Start Covid Center for Workers through State Employees Insurance Corporation (ESIC)

राज्य गुणवंत कामगार असोसिएशन यांचेवतीने आग्रही मागणी..

औद्योगिक क्षेत्रातील कामगार व मालक यांची मासिक वर्गणी, 'राज्य कर्मचारी विमा महामंडळास (ESIC)" कडे जमा केली जाते. या माध्यमातून पात्र कामगार व कामगार कुटुंबियांना वैद्यकीय सेवा व सुविधा आदींचा लाभ दिला जातो.

सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे, राज्यातील कष्टकरी औद्योगिक कामगार या काळात पूर्णपणे उध्वस्त झालेला आहे. पूर्ण क्षमतेने काम नाही या कारणास्तव, अनेक कंपन्यांनी वेतन कपातीचे धोरण स्विकारलेले आहे. त्यामुळे कामगारांची सर्वच प्रकारची कर्जे व एल. आय. सी. हप्ते आजपावेतो थकीत आहेत. त्यामुळे कामगार वर्ग हवालदिल झालेला आहे.

राज्याची व देशाची आर्थिक घडी नीट बसावी, देशाचा जीडीपी दर कमी होऊ नये, औद्योगिक कंपन्यांची ऑर्डर नियोजित वेळेत दिली जावी, कंपन्या बंद पडू नयेत या व अशा अनेक कारणांमुळे राज्यामध्ये औद्योगिक कंपन्या सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. यामुळे अनेक कामगारांना, कोरोनाची लागण झालेली आहे. 

सध्या राज्य कर्मचारी विमा महामंडळाकडे (ESIC) खूप मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध आहे. कोल्हापूरमध्ये जरी राज्य कर्मचारी विमा महामंडळाचे (ESIC) मोठे हॉस्पिटल उपलब्ध असले तरी, पूर्ण सुविधा अद्यापही उपलब्ध नाहीत. पात्र कामगारांना "कोरोनाची लागण झाल्यास", त्यांचेवतीने इतर हॉस्पिटलमध्ये उपचार घेणेकरीता सुचविले जाते व नंतर संबंधित कामगारास झालेले बिल, रिफंड केले जाते. 

सध्या जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे , संबंधित कामगारांना वेळेत बेड, ऑक्सिजन व व्हेंटिलेटर न मिळाल्यामुळे, काही कामगार मृत पावलेले आहेत व त्यांच्या कुटुंबियांनादेखील याचा प्रादुर्भाव सुरू आहे.

त्यामुळे इतर जिल्ह्याप्रमाणे "राज्य कर्मचारी विमा महामंडळा" च्यावतीने, कोल्हापूर जिल्ह्यातील मोठ - मोठी मंगल कार्यालये व तत्सम हॉल भाड्याने घेऊन, त्या ठिकाणी "फक्त आणि फक्त" ESIC सुविधेस पात्र, "कामगार व कामगार कुटुंबीये" यांचेकरीता, अद्ययावत सोयींनी युक्त असे "कोविड सेंटर" उभा करून, कामगार वर्गास दिलासा द्यावा. जेणेकरून योग्य उपचार वेळेत मिळून, त्यांनी रिफंड बिल मागण्याचा प्रश्नच उद्धवणार नाही. त्यामुळे सदर योजनेस पात्र कामगार व कामगार कुटुंबियांना दिलासा मिळेल.

संदर्भीय पत्रास अनुसरून, सदर महामंडळाकडे (ESIC) मोठ्या प्रमाणात निधी शिल्लक असताना, पात्र कामगार व त्यांच्या कुटुंबियांना, उपचारासाठी इतरत्र दारोदारी पळावे लागत आहे, ही बाब गंभीर व खेदजनक आहे. तरी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर कोविड सेंटर उभा करून, औद्योगिक कामगारांना न्याय द्यावा, अशा आशयाचे निवेदन पालकमंत्री कोल्हापूर जिल्हा सतेज पाटील, कामगार मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने यांना मेलद्वारे दिले असलेचे, असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी आमच्या सांगितले.