रेकॉल्ड (Racold) कंपनीचे कामगार न्यायाच्या प्रतीक्षेत

Racold company workers await for justice

चाकण : चाकण औद्योगिक वसाहतीतील वॉटर हिटर उत्पादन करणाऱ्या अग्रगण्य व नामांकित असलेल्या रेकॉल्ड थर्मो प्रायव्हेट लिमीटेड (अँरिस्टान थर्मो ग्रुप) (Racold Thermo Pvt. Ltd. (Ariston Thermo Group)) या बहुराष्ट्रीय कंपनी व्यवस्थापनाने कंपनीत काम करणाऱ्या सर्व कायम कामगारांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता १ नोव्हेंबर २०१८ रोजी कंपनी अचानकपणे बंद केली.

      १ नोव्हेंबर २०१८ रोजी कंपनी व्यवस्थापनाने अचानकपणे कंपनी बंद केलेले सर्व कामगार हे गेल्या वीस वर्षापासून कंपनीमध्ये कायम कामगार म्हणून काम करीत होते या सर्व कामगारांनी आपल्या आयुष्यातील अतिशय मोलाचा काळ कंपनीच्या प्रगतीकरिता दिलेला असून बहुतांश कामगारांचे वय हे आज ४० ते ४५ वर्ष या दरम्यान असून त्यांच्यावर कुटुंबाचे पालनपोषण करण्याची असलेली जाबाबदारी, मुलांचे शिक्षण,आई-वडिलांच्या आरोग्याचा खर्च,घरासाठी बँकांचं घेतलेलं कर्ज,यामुळे कामगारांना आपले भविष्य अंधारमय दिसत आहे. नोकरी नसल्याने कुटूंबाची होत असलेली अवस्था पाहून घर कसे चालवावे हा प्रश्न कामगारांपुढे निर्माण झालेला आहे.

           आज या घटनेला अडीच वर्षाहून अधिक कालावधी झालेला असून, सदर प्रकरण न्यायालयीन असताना सध्या कामगारांना हलाखीचे जीवन जगावे लागत आहे. हे सर्व कामगार सध्या शासकीय पातळीवरती सर्व अधिकारी, राजकीय नेते, कंपनी व्यवस्थापन यांच्याकडे न्याय मिळेल या भावनेतून पाहत असून यात होत असलेल्या विलंबामुळे कामगारांमध्ये नैराश्याची भावना निर्माण झाली आहे.