50 workers of Cummins Company in Pune found corona active patients
पुण्यातील डहाणूकर कॉलनी येथे असणाऱ्या 'कमिन्स' कंपनीत (Cummins) देखील कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले असून ५० कोरोना रुग्ण आढळून आले आहे. याच कारणास्तव कमिन्स कंपनीला 'कोरोना हॉटस्पॉट' (Corona Hotspot) क्षेत्र म्हणून जाहीर करताना कालपासून ( दि.२०) ते २३ मे असे ३ दिवस कंपनी बंद ठेवण्याचे आदेश कोथरुड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाने दिले आहे.
कोथरुड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त सचिन तामखडे यांनी याबाबत कमिन्स कंपनीचे व्यवस्थापक राजेंद्र कुलकर्णी यांना पत्र पाठवले आहे. यात राज्य शासन व पुणे महापालिकेच्या कोरोना प्रतिबंधक नियमांचे कंपनीत काटेकोरपणे पालन होत नसल्याचे नमूद केले आहे.
तसेच गेल्या २ महिन्यांच्या कालावधीत कंपनीत जवळपास २४० कामगारांना कोरोनाची लागण झाल्याचे त्यातील ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. आणि सध्याच्या घडीला ५० कामगार कोरोनाबाधित आहे.याचवेळी कंपनीतील कामगारांची जेवणाची व्यवस्था एकाच ठिकाणी असल्याने कामगारांची गर्दी होत आहे. यातून कोरोना प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याचेही पत्रात स्पष्टपणे सांगितले आहे.
याच पार्श्वभूमीवर कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक महापालिका आयुक्त सचिन तामखडे यांनी पाठवलेल्या पत्रात कंपनीचे कामकाज तीन दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. त्याचसोबत सर्व कामगारांची कोविड चाचणी करून त्याचा अहवाल २२ तारखेपर्यंत सादर करावा. तसेच कामगारांना फेसशिल्ड मास्क उपलब्ध करून देण्यात यावे, कॅन्टीनमध्ये बसून कामगारांना जेवणाला प्रतिबंध करण्यात घालण्यात आला आहे. याचवेळी सर्व कामगारांचे लसीकरण लवकरात लवकर करून घेण्याचे आदेश देतानाच कंपनीचा परिसर व यंत्र सामग्री यांचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्याचेही सक्त ताकीद प्रशासनाने कंपनीला दिली आहेत.
या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करून गांभीर्यपूर्वक पालन करण्यात यावे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास आपणविरोधात उपरोक्त संदर्भान्वये व प्रचलित अधिनियमान्वये कारवाई करण्यात येईल,याची गांभीर्याने नोंद घ्यावे. असे महापालिकेने कंपनीला दिलेल्या पत्रात सांगितले आहे.