The aid announced by the state government for unorganized sector workers will be delivered to the workers in the next eight days said by Labor Minister Hasan Mushrif
लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर राज्य शासनाने असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी जाहीर केलेली मदत कामगारांपर्यंत येत्या आठ दिवसांमध्ये पोहोचवली जाईल, असे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यातील कामगार संघटनांसमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीमध्ये (दि.२२ एप्रिल) सांगितले.
प्रत्येकी पंधराशे रुपयांची मदत
नोंदणीकृत बांधकाम कामगार कल्याण योजनेंतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर कामगार कल्याणकारी मंडळाच्या निधीमधून राज्यातील नोंदणीकृत अशा सुमारे १२ लाख बांधकाम कामगारांना प्रत्येकी पंधराशे रुपयांचे अनुदान देण्यात येईल अशी घोषणा केली असून या घोषणेची अंमलबजावणी करण्यासाठी कामगार विभाग काम करीत आहे. याशिवाय राज्यातील अनेक असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांपर्यंत कामगार विभाग पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे.
या बैठकीस खासदार अरविंद सावंत, आमदार भाई जगताप, आमदार शशिकांत शिंदे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनीषा पाटणकर- म्हैसकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद- सिंघल, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, कामगार आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांच्यासह राज्यातील कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.