Labour Ministry restarts 20 control rooms set up to address grievances of migrant workers
कोविड -१९ चा वाढता प्रादुर्भाव आणि त्या अनुषंगाने राज्य सरकारांनी काही निर्बंध लादल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या कामगार व रोजगार मंत्रालयाने देशभरातील मुख्य कामगार आयुक्त (मध्यवर्ती) कार्यालयांतर्गत विविध राज्य सरकारांशी समन्वयाच्या माध्यमातून स्थलांतरित कामगारांच्या समस्या दूर करण्यासाठी एप्रिल २०२० मध्ये स्थापन करण्यात आलेल्या २० नियंत्रण कक्षांचा कायापालट केला आहे. लाखो कामगारांनी गेल्या वर्षी या सुविधेचा वापर केला होता आणि त्यांच्या तक्रारींचे निवारण झाले होते.
गरजू आणि संकटात असलेले कामगार ईमेल, मोबाइल आणि व्हॉट्स ऍपच्या माध्यमातून या नियंत्रण कक्षांशी संपर्क साधू शकतात. या नियंत्रण कक्षांचे व्यवस्थापन श्रम अंमलबजावणी अधिकारी, सहाय्यक कामगार आयुक्त, प्रादेशिक कामगार आयुक्त आणि संबंधित विभागांचे उप-मुख्य कामगार आयुक्त यांच्यामार्फत केले जात आहे. मुख्य कार्यकारी आयुक्तांकडून दररोज मुख्यालयातील सर्व २० कॉल सेंटरच्या कामकाजावर देखरेख ठेवली जात आहे आणि मुख्य कामगार आयुक्त (सी) व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक राज्य भेटीदरम्यान संबंधित विभागांकडून त्याचा आढावा घेतला जात आहे.
सर्व संबंधित अधिकार्यांना "कामगारांना जास्तीत जास्त प्रमाणात मदत करावी आणि गरजूंना वेळेवर दिलासा मिळावा." यासाठी मानवतावादी दृष्टिकोन अंगिकारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
देशाचे मुख्य कामगार आयुक्त म्हणाले की महामारीचे आव्हान मोठे असून कामगारांवर विविध प्रकारे परिणाम होत आहे. परंतु समर्पित अधिकाऱ्यांच्या सहाय्याने कामगारांच्या समस्या शक्य तितक्या सोडवण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी दिले.