कामगार करणार मुंडन आंदोलन

पुणे : हमाल पंचायतीकडून कामगारांचे विविध प्रश्न दोन महिन्यांत सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले होते परंतु अद्याप पर्यंत प्रश्नी मार्गी लागले नसून याविरोधात हमाल भवनसमोर मुंडन करून येत्या मंगळवारपासून (दि. ६) बेमुदत उपोषण करणार असल्याची माहिती कामगार सोमनाथ पानसरे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना पानसरे यांनी सांगितले कि, फेब्रुवारी मध्ये कामगारांच्या विविध प्रश्नासाठी आंदोलन करत असताना आम्हाला तुमचे सर्व प्रश्न दोन महिन्यात मार्गी लावू असे सांगितले परंतु अद्याप या वरती कार्यवाही न झाल्यामुळे कामगार हमाल भवनसमोर मुंडन करून उपोषण करणार असून याबाबत निवेदन हमाल पंचायतचे अध्यक्ष, ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांना दिले आहे. 

याबाबत पानसरे म्हणाले की, हमाल भवनमधील व्यवस्थापक आणि काही पदाधिकारी एकाधिकारशाहीने वागत कामगारांवर अन्याय करत आहेत. व्यवस्थापकांचे तत्काळ निलंबन करावे, ठराविक पदाधिकाऱ्यांकडे असणारी संघटनेची अनेक पदे विभागून द्यावी. पदाधिकारी पदाच्या निवडणुका घ्याव्यात, तसेच भुसार बाजारातील कामगार भरतीची चौकशी व्हावी, सर्व कामगारांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी डॉ. आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली महिना किंवा दोन महिन्यातून एक बैठक घ्यावी आदी मागण्यांसाठी उपोषण करण्यात येणार आहे.