कर्मचारी संघटनेचे ज्येष्ठ नेते र. ग. कर्णिक यांचं निधन

मुंबई: राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे माजी सरचिटणीस व लोकप्रिय कामगार नेते रमाकांत गणेश उर्फ र. ग. कर्णिक यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. वांद्रे येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ९१ वर्षांचे होते. कर्णिक यांच्या निधनामुळं आधारवड हरपल्याची भावना कामगार क्षेत्रात व्यक्त होत आहे.

      र.ग.कर्णिक यांनी सलग ५० वर्षे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे समर्थपणे नेतृत्व करुन सन्मानपूर्वक सेवा शर्ती आणि वेतनाचे लाभ मिळवून दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली ५४ दिवसांचा संप हा कामगार/कर्मचारी चळवळीतील मैलाचा दगड आहे. मंत्रालयीन कर्मचारी संघटना कर्णिक यांनी १९५६ साली प्रथम बांधली. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे महाराष्ट्राचे १९६२ पासून स्थापना आणि नेतृत्व केले ते २०१४ पर्यंत संघटनेचे विद्यमान संस्थापक सल्लागार होते.

     केंद्राप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता द्यावा या तसेच अन्य मागण्यांसाठी त्यांनी ११ ऑगस्ट १९६६ रोजी एक दिवसाच्या सामुदायिक रजेचे आंदोलन आखले व त्यासाठी राज्यभर दौरा केला. संघटनेचे हे प्रारंभीचे आंदोलन चांगलेच परिणामकारक ठरले. नंतर बडकस आयोगाच्या वेतनश्रेण्या १७०० वरून १८०वर आणण्याच्या शिफारसीमुळे ज्या वेतनत्रुटी निर्माण झाल्या होत्या त्या दूर करण्यासाठी त्यांनी सरकारशी अत्यंत अभ्यासपूर्ण चर्चा केली. कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्तेविषयक मागण्यांसाठी एक व तीन दिवसांचा संप करूनही मागण्यांची तड लागेना, तेव्हा त्यांनी ११ नोव्हेंबर १९७० पासून बेमुदत संप पुकारला. त्याबद्दल त्यांना अटक झाली. अन्य नेत्यांचीही धरपकड झाली. त्यावेळी तुरुंगातूनच त्यांनी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याशी यशस्वी वाटाघाटी केल्या. संप किती ताणायचा व तो कुठे थांबवायचा याचे अचूक भान कणिर्क यांना होते. त्यामुळे त्यांच्या आंदोलनांतून सर्वमान्य असा तोडगा निघायचा.