कोल्हापूर : महापालिकेमधील कर्मचारी, ठेकेदार आणि काही अधिकाऱ्यांकडून संगनमताने कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण केले जात आहे. याबाबत अखिल भारतीय किसान कांग्रेस आणि कामगार कर्मचारी संघर्ष युनियन यांच्यावतीने मनपा आयुक्त रविकांत अडसूळ यांना निवेदन देण्यात आले.
महापालिकांमधील कंत्राटी कामगारांची अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमताने गेली अनेक वर्षे आर्थिक पिळवणूक सुरू आहे. किमान वेतन कायदा धाब्यावर बसवून कामगारांच्या कष्टाच्या पैशांवर गबर होणाऱ्या अधिकारी व ठेकेदारांच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. महापालिकेतच विविध विभागांमध्ये हजारो कंत्राटी कामगार आहेत. गेली अनेक वर्षे ते काम करीत आहेत. ठेकेदार कंपन्यांच्या माध्यमातून त्यांची नियुक्ती करण्यात येते. या सर्व कामगारांना किमान वेतन कायद्यासह भविष्यनिर्वाह निधीसारखे सर्व नियम लागू आहेत. परंतु हे सर्व हक्क नाकारले जातात अशी माहिती यावेळी अखिल भारतीय किसान कांग्रेस आणि कामगार कर्मचारी संघर्ष युनियनचे प्रदेक्षाध्यक्ष संजय पाटील यांनी दिली त्याचवेळी अन्य महापालिकांमधील कंत्राटी कामगार संघटनांबरोबर चर्चा करून या प्रश्नावर राज्यव्यापी संघटन उभे करून आवाज उठवला जाईल असे पाटील यांनी सांगितले.
निवेदन देताना संजय पाटील यांच्याबरोबर अनिल कवाळे ,संग्राम जाधव, रियाज जैनापुरे, ओमकार हिरवे, अतुल पाटील, निवास भारमल, परवेज सय्यद, तानाजी मोरे, अर्जुन बुचडे, मोहन पाटील उपस्थित होते.
यावेळी उपायुक्त यांनी आश्वासन दिले कि, दहा टक्के कंत्राटी कर्मचाऱ्यांचे व्हिडिओ जवाब घेऊन खात्री करणार दोषी आढळल्यास ठेके रद्द केले जातील.