Maharashtra Labour Welfare Board MLWB has appealed to use the online portal of financial benefit schemes.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कामकाज आता ऑनलाईन पध्दतीने चालणार आहे. यापूर्वी कामगारांना मंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रभर कार्यरत असलेल्या कामगार कल्याण केंद्रांशी संपर्क करुन आपला अर्ज सादर करावा लागत होता. विविध कंपनीमधील कामगार जे मंडळाचा कामगार कल्याण निधी रु १२ हा फंड दर जून व डिसेंबर या महिन्यात पगारातून भरणा करतात, अशा कामगारांना मंडळाच्या योजनांचा लाभ सुलभरीत्या घेता यावा याकरीता मंडळाचे कामकाज जानेवारी २०२० पासून ऑनलाईन पध्दतीने सुरु झाले.
सुरुवातीच्या टप्यात आस्थापना नोंदणी व मालक नोंदणी ऑनलाईन पध्दतीने सुरु करण्यात आली. सदर नोंदणी कशी करावी यासाठी मंडळाच्या वतीने फेब्रुवारी मध्ये उद्योजक व आस्थापना अधिकारी यांना प्रशिक्षणही देण्यात आले. दुसऱ्या टप्यात कामगारांना मंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या सर्व योजना ऑनलाईन सुरु करण्यात आल्या आता कामगार स्वतःसाठी आपल्या पाल्यासाठी असलेल्या आर्थिक लाभाच्या योजना आपल्या घरी बसुन मोबाईलवर मंडळाने लाँच केलेल्या 'महाकल्याण' या ॲपवर घेऊ शकतो तसेच https://public.mlwb.in या संकेत स्थळावर जाऊनही कामगार किंवा कामगार पाल्य मंडळाच्या विविध योजनांसाठी आपला अर्ज सादर करु शकतो यासाठी मंडळाकडून प्रत्येक कामगांरास दिलेला लिन नंबर हा यूजर नेम म्हणून तर कंपनीकडे त्याने रजिस्टर केलेला मोबाईल नंबर हा पासवर्ड म्हणून वापरावा लागेल.
पब्लिक पोर्टलवर दिलेल्या युजर मॅन्यूअल या ऑपशनमध्ये उद्योजक, मालक, नोंदणी आस्थापना नोंदणी व कामगार नोंदणी कशी करावी तसेच मंडळाच्या विविध योजनांसाठी अर्ज कसे करावेत. याबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.
सर्वसाधारण शिष्यवृत्ती, परदेश शिक्षण शिष्यवृत्ती, क्रीडा शिष्यवृत्ती, पाठ्यपुस्तक अर्थसहाय्य, एमएससीआयटी अर्थसहाय्य, गंभीर आजार उपचार सहाय्यता अशा विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी मंडळाच्या ऑनलाईन पोर्टलचा वापर करावा तसेच ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम दि.१५ फेब्रुवारी २०२१ असून पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील कामगार वर्गाने ऑनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन मंडळाच्या पुणे विभागाचे प्रभारी सहाय्यक कल्याण आयुक्त समाधान भोसले यांनी केले आहे.