पुणे : पुण्यात आणखी एका नव्या मेडिकल कॉलेजला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे पुणे शहरासाठी एमबीबीएसच्या आणखी जागा वाढणार आहेत. बिबवेवाडी येथील ईएसआयसी रुग्णालयात एमबीबीएसच्या ५० विद्यार्थी क्षमतेच्या वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता मिळाली आहे. २०२७-२८ पासून विद्यार्थ्यांना प्रवेश सुरू होणार आहेत. यापूर्वी दोन वेळा प्रस्ताव नाकारण्यात आल्यानंतर अपील प्रक्रियेतून मान्यता मिळाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नगरसेवकांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र आणि पुण्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण पुण्याला एक नवं मेडिकल कॉलेज मिळालं आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने पुण्यासाठी ५० एमबीबीएसच्या जागा असणाऱ्या मेडिकल कॉलेजसाठी मंजुरी दिली आहे. हे नवं कॉलेज बिबवेवाडी येथील ईएसआयसी हॉस्पिटलमध्ये उभारलं जाणार आहे. त्यामुळे आता २०२७-२८ पासून पुण्यातील हे नवं मेडिकल कॉलेज कार्यरत होणार आहे.

