ग्रावर अँड वेल (इंडिया) लिमिटेड (Grauer and Weil (India) Limited) येथे वेतनवाढ करार संपन्न

आळंदी  (पुणे) : औद्योगिक क्षेत्रात सौहार्दपूर्ण वातावरणाचे एक उत्तम उदाहरण घालून देत, ग्रावर अँड वेल (इंडिया) लिमिटेड, आळंदी येथील इंजिनिअरिंग डिव्हिजन आणि भारतीय कामगार सेना यांच्यामध्ये सोमवार , दि. २६ मे २०२६ रोजी  वेतन करार यशस्वीरीत्या संपन्न झाला. या करारामुळे कंपनीतील कायम कामगारांना थेट लाभ होणार असून, औद्योगिक वर्तुळात या करारांची विशेष दखल घेतली जात आहे.

कराराची ठळक वैशिष्ट्ये खालील प्रमाणे :

    सदर वेतन करार १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२८ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी लागू राहणार आहे. करारान्वये कामगारांना ₹११,००० ग्रॉस इतकी वेतनवाढ मंजूर करण्यात आली असून, करार लागू झाल्याच्या दिनांकापासून सर्व थकीत आर्थिक फरक (Arrears) अदा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही व्यवस्थापनाने घेतला आहे. याशिवाय, कामगारांच्या इतर सर्व सुविधा पूर्ववत कायम ठेवण्यात आल्या आहेत.

खासदार श्री . अरविंद सावंत व श्री . प्रकाश नाईक व  यांची मार्गदर्शक भूमिका

या संपूर्ण करार प्रक्रियेत भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार श्री . अरविंद सावंत व सह चिटणीस  श्री . प्रकाश नाईक यांनी मुख्य मार्गदर्शक म्हणून अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. त्यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली हा करार सुरळीत व यशस्वीपणे पूर्ण होऊ शकला, असे कामगार प्रतिनिधींनी सांगितले.

स्वाक्षरी सोहळा उत्साहात संपन्न

करारावर स्वाक्षऱ्यांचा सोहळा जोगेश्वरी, मुंबई  येथील कंपनीच्या कॉर्पोरेट ऑफिस मध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने श्री. शशिकांत साखळकर  (मुख्य कॉर्पोरेट एफ्फेअर्स), श्री. किशोर गागरे (उपाध्यक्ष - एचआर ऑपरेशन्स) आणि श्री. राजेंद्र कांबळे (वरिष्ठ सरव्यवस्थापक - आयआर ऑपरेशन्स) यांनी सहभाग घेतला.

भारतीय कामगार सेनेच्या वतीने सह चिटणीस  श्री . प्रकाश नाईक, तसेच स्थानिक युनिटचे पदाधिकारी — अध्यक्ष श्री. ईश्वर गायकवाड , चिटणीस श्री. अशोक मारभल व श्री. संतोष सिंग आणि गजानन शेळके हे उपस्थित होते.

कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण

आज पर्यंतच्या इतिहासात ह्या करारान्वये सर्वाधिक वेतनवाढ कर्मचाऱ्यांना मिळाली आहे त्यामुळे या ऐतिहासिक कराराने कंपनीतील सर्व कामगारांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण पसरले आहे. व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्यातील परस्पर विश्वास आणि सहकार्याचे हे करार एक उत्तम प्रतीक असल्याचे मत कामगार प्रतिनिधींनी व्यक्त केले. हा करार म्हणजे केवळ वेतनवाढ नव्हे, तर कामगारांच्या सन्मानाचा आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेचा करार असल्याचे श्री . प्रकाश नाईक यांनी यावेळी नमूद केले.