पिंपरी चिंचवड : श्रमिक एकता महासंघ यांच्या वतीने आज पुणे, निगडी येथील ग. दि. माडगूळकर सभागृहात जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त भव्य कामगार मेळावा व पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कामगार नेते तथा नॅशनल ट्रेड युनियन फेडरेशनचे अध्यक्ष श्री. शिवाजीराव खटकाळे भाऊ, तसेच उद्घाटक म्हणून मा. अॅड. भूषण तपस्वी (अध्यक्ष, LLPA) आणि कामगार नेते श्री. अरुण बोराडे उपस्थित होते.
या भव्य मेळाव्यात मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये—
* रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे पुरस्कार : श्री. रोहित दगडू बर्गे (संपादक, थरार न्यूज नेटवर्क)
* राजर्षी शाहू महाराज पुरस्कार : श्री. के. सुधाकर (सीनियर जनरल मॅनेजर, HR, JCB India Ltd.)
* लढाऊ कामगार संघटना पुरस्कार : S.F.S. एम्प्लॉईज युनियन
* आदर्श कामगार संघटना पुरस्कार : कॉन्सेन्ट्रिफ कामगार संघटना
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे श्री. शिवाजीराव खटकाळे यांनी जागतिक कामगार दिनाच्या शुभेच्छा देत आपल्या भाषणात कामगार चळवळीसमोरील नव्या आव्हानांवर प्रकाश टाकला. बदलत्या परिस्थितीत एकजुटीने आणि संघटितपणे लढा देणे अत्यावश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.
अॅड. भूषण तपस्वी यांनी कामगार कायद्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन करत नवीन कायदे समजून घेण्याची गरज अधोरेखित केली.
श्री. अरुण बोराडे यांनी श्रमिक एकता महासंघाची स्थापना, उद्दिष्टे, कामगार चळवळीची सद्यस्थिती, तसेच कामगार नेत्यांची जबाबदारी यावर विचार मांडले.
सल्लागार श्री. मारुती जगदाळे यांनी येणाऱ्या नवीन लेबर कोडबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहन केले. हे संकट नसून संधी म्हणून पाहिले, तर कामगारांच्या हितासाठी नवे मार्ग खुले होतील, असे त्यांनी सांगितले.
श्री. दिलीप पवार यांनी आर्थिक नियोजनाबाबत मार्गदर्शन करत मार्केटमधील प्रलोभनांना बळी न पडता सुजाण निर्णय घेण्याचे महत्त्व स्पष्ट केले.
कार्यक्रमात श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष श्री. किशोर सोमवंशी, जनरल सेक्रेटरी श्री. रोहित वसंत पवार व पदाधिकारी यांना मान्यवरांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत अडचणीच्या काळात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
अध्यक्षीय भाषणात श्री. किशोर पाराजी सोमवंशी यांनी सांगितले की, “आगामी काळ आव्हानात्मक असला तरी ज्येष्ठांचे मार्गदर्शन, अभ्यासपूर्ण भूमिका आणि कामगारांची एकजूट यामुळे कोणतेही संकट आपण पार करू शकतो.”
कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री. विकास कर्पे व श्री. रोहित वसंत पवार यांनी सादर करत वर्षभरातील कामकाजाचा आढावा मांडला.
आभार प्रदर्शन सौ. विद्याताई तांबे यांनी केले, तर सुत्रसंचालन श्री. राजेंद्र पाटील व श्री. सचिन गुंजाळ यांनी प्रभावीपणे पार पाडले.
या भव्य मेळाव्याच्या माध्यमातून कामगार एकतेचा संदेश देत भविष्यातील संघर्षासाठी सज्ज राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.


