पुणे : देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देणाऱ्या 'फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुड्स' (एफएमसीजी) क्षेत्रातील विक्री कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी 'विविध वस्तू विक्री कर्मचारी वेल्फेअर असोसिएशन'तर्फे करण्यात आली. कामगार दिनानिमित्त असोसिएशनतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते असे वृत्त सकाळ वृत्तसंस्थेने दिले आहे.
"ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता कंपन्यांची विक्री वाढविणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर कामाचे लक्ष्य पूर्ण करण्याचा ताण असतो. मात्र, त्यांना स्थिर वेतन, आरोग्य विमा व निवृत्तीची हमी यांसारख्या मूलभूत सुविधा मिळत नाहीत. ते असुरक्षित वातावरणात काम करत करतात. एफएमसीजी क्षेत्राचा नफा वाढत असताना मानवी श्रमांकडे होणारे दुर्लक्ष अन्यायकारक आहे," अशी खंत असोसिएशनचे प्रदेश कार्याध्यक्ष राहुल मुंगले आणि सचिव दीपक अडकमोल यांनी यावेळी व्यक्त केली आहे. या मागणीची तत्काळ दखल घ्यावी, अशी अपेक्षा नीलेश रुणवाल यांनी व्यक्त केली आहे.
कार्यक्रमाला ज्येष्ठ कर्मचारी सचिन शर्मा, राज्य उपाध्यक्ष गुलफराज काझी, जिल्हाध्यक्ष विनायक खंडाळकर आदी उपस्थित होते. लक्ष्मीनारायण सोनार यांनी सूत्रसंचालन केले. चेतन चव्हाण यांनी आभार मानले.
.jpg)