सध्याची कामगार चळवळ दुर्बळ : पवार

पिंपरी : ''आजच्या कामगार चळवळीत अनेक प्रवाह असल्यामुळे आपापसात वैचारिक लढाई सुरू असते. त्यामुळे कामगार चळवळ दुर्बळ झाली आहे. सत्याग्रही मार्गाने चळवळ चालवणे अवघड झाले आहे. समाजकारण, राजकारण यात सुसंस्कृतपणा हरवला आहे. अशा पार्श्वभूमीवर समाजाला विधायक ऊर्जा देणाऱ्याच्या मागे आपण खंबीरपणे उभे राहिले पाहिजे,'' असे प्रतिपादन माजी आमदार उल्हास पवार यांनी केले आहे असे वृत्त सकाळ वृत्तसंस्थेने दिले आहे.

    पिंपरी येथील ऑटो क्लस्टर सभागृहात एच.ए. कामगार लढ्याची यशोगाथा असलेल्या 'गाथा संघर्षाची' या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. कामगार नेते अरुण बोऱ्हाडे यांचे आत्मकथन असलेल्या आणि दादाभाऊ गावडे यांच्या लेखणीतून साकारलेल्या 'गाथा संघर्षाची' या पुस्तकाचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कामगार नेते अजित अभ्यंकर, मानव कांबळे, डॉ. कैलास कदम, माजी महापौर संजोग वाघेरे, दिलीप पवार, मारुती भापकर आदी उपस्थित होते. संयोजन संदीप तापकीर, डॉ. सीमा काळभोर, एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर, रामभाऊ सासवडे, दामोदर वहिले, तेजस्विनी देशमुख आदींनी केले. सूत्रसंचालन दिगंबर ढोकले यांनी केले. आभार डॉ. पौर्णिमा कोल्हे यांनी मानले.